

पुणेः मनी लॉन्ड्रिंगचा धाक दाखवून तुमचा मोबाईल क्रमांक गैरकृत्याकरीता वापरल्याचे सांगून पोलिस गणवेश परिधान केलेल्या सायबर चोरट्याने व्हिडीओ कॉलवर धाक दाखवत ज्येष्ठाकडून 48 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हांडेवाडी रोड हडपसर येथील 69 वर्षीय व्यक्तीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींना फोन करून मनी लॉन्ड्रिंगचा धाक दाखविला. तुमचा मोबाईल गैरकृत्यात वापरला आहे. फिर्यादींना विश्वास वाटावा म्हणून सायबर चोरट्याने पोलिसांचा गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉलद्वारे त्यांना दम भरला.
त्यानंतर फिर्यादींच्या मालमत्तेची माहिती सायबर चोरट्यांनी घेतली व्हिडीओ कॉलवर त्याची पडताळणी करायची आहे, असे सांगून सर्व माहिती घेतली.
तुम्ही माहिती दिली नाही तर तुम्हाला दंड तसेच कारावास होईल, असे सांगून बँक खात्याची पडताळणी करायची आहे, असे म्हणून बँक खात्यावर पैसे पाठवून घेतले. अशाप्रकारे सायबर चोरट्यांनी फिर्यादींची तब्बल 48 लाख रुपयांची फसवणूक केली.