

येरवडा: येरवड्याच्या शास्त्रीनगर चौक परिसरात मागील एक महिन्यापासून पाणी गळती सुरू आहे. सकाळी पाणीपुरवठा सुरू असताना हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
गळती थांबवण्यासाठी लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शास्त्रीनगर चौक परिसरात सकाळी सात ते नऊदरम्यान या ठिकाणी पाणी सोडण्यात येते. त्यावेळेत रस्त्याच्या मध्य भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होताना दिसून येते. सदर ठिकाणी पाण्यामुळे मोठा खड्डा पडला आहे. तसेच, पाणी रस्त्यावर वाहत असल्याने या ठिकाणी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच, खड्ड्यात वाहने आदळत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तरी सदर ठिकाणी पाणी गळतीवर लवकर उपाययोजना करण्यात याव्यात आणि सदरची पाणी गळती थांबवावी. तसेच, खड्डा बुजवण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
सकाळी सदर ठिकाणी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठा अपघात होण्याचे नाकारता येत नाही, तरी सदर ठिकाणी पाणी गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.
संतोष सुकाळे, वाहनचालक