Robbery Gang Arrested: पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांची लूट करणारी टोळी अखेर जेरबंद!
पुणे: पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी मालधक्का परिसरातून जेरबंद केले.
जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (वय ३२, रा. पीर वस्ती, वडकी, सासवड रस्ता), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३५), खुट्टाराज अंजीलप्पा विभुती (वय १९), शिवप्रकाश कुमार (वय २३), चौपाट्या उर्फ राजेश मंगल मंडल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी, पोलिस शिपाई शरद गायकवाड यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख, शिरोळे, विभूती, मंडल, कुमार हे फिरस्ते आहे. पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट परिसरात त्यांचा वावर आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील मोबाइल, तसेच रोकड हिसकावण्याचे गुन्हे त्यांनी केले आहे. पुणे स्टेशन येथील मालधक्का रस्त्यावर चोरट्यांची टोळी थांबली असून, प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत चोरटे असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे , मिरची पूड, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करत आहेत.
