

पुणे: आगाखान पॅलेसच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत आगाखान पॅलेसमधील उद्यान सहाय्यक ओंकार गरुड (वय ४०) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील आगाखान पॅलेसच्या आवारात कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योग विद्यालय आहे. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरटे आगाखान पॅलेसच्या आवारात शिरले. चोरट्यांनी कस्तुरबा गांधी खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड कापले. चंदनाच्या झाडाचा बुंधा करवतीने कापण्यात आला.
बुंधा चोरून चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली.
पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक जऱ्हाड तपास करत आहेत. पोलिसांनी आगाखान पॅलेसच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात चंदनचोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. प्रामुख्याने शासकीय कार्यालये, संशोधन संस्थांच्या आवारातील चंदनवृक्षांची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.