

पुणे: किरकोळ भांडणातून महिलेला वीट आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा खून करणाऱ्या बाप-लेकाला पोलिसांनी सहा तासांत बेड्या ठोकल्या आहेत. येरवड्यातील नवी खडकी, जिजामातानगर परिसरात ही घटना घडली होती. महिलेचा खून केल्यानंतर बाप-लेकांनी तिचा मृतदेह दोन तीन दिवस घरात ठेवला. मात्र दुर्गधी सुटल्यानंतर दोघांनी तो मृतदेह लोहगाव स्मशानभूमीजवळील कचराकुंडीच्या परिसरात टाकून पळ काढला होता. दरम्यान, एका रिक्षाचा धागा पकडून विमानतळ पोलिसांनी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्वक तपास करून खुनाचा छडा लावला.
सुवर्णा (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुवर्णा फिरस्ती असून, तिचे पूर्ण नाव समजले नाही. तर रवी रमेश साबळे (वय ३५), त्याचे वडील रमेश रामचंद्र साबळे (वय ६५, रा. जिजामातानगर, नवी खडकी, येरवडा) अशी अटक केलेल्या बापलेकांची नावे आहेत. रवी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. दोघांच्या विरुद्ध येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी साबळे याची सुवर्णा नावाच्या महिलेशी काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन परिसरात ओळख झाली होती. सुवर्णा रवीच्या घरी त्यांच्यासोबतच राहत होती. किरकोळ कारणावरून रवीचा तिच्याशी वाद झाला. त्यानंतर रवी आणि त्याचे वडील रमेश यांनी तिला घरात वीट आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी झालेल्या सुवर्णाला दोघांनी रुग्णालयात उपचारसाठी दाखलही केले नाही. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर दोघांनी दोन ते तीन दिवस मृतदेह घरात ठेवला. मृतदेह दोन-तीन दिवस घरात ठेवल्यानंतर दुर्गंधी सुटली. दोघांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून रिक्षातून लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स्मशानभूमी परिसरात नेला. त्यानंतर या भागातील मोकळ्या जागेतील कचराकुंडीजवळ टाकून पळ काढला.
लाइट बंद असलेली रिक्षा अन् खुनाचा छडा
मंगळवारी (दि.18) सकाळी लोहगाव स्मशानभूमी परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. मुंडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार विमानतळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांचे सहकारी आरोपींचा माग काढत होते. त्यावेळी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, त्यांना लाइट बंद असलेली एक संशयास्पद रिक्षा दिसून आली. तोच धागा पकडून पोलिस उपनिरीक्षक राठोड येरवड्यातील यशवंतनगर भागात पोहचले. पोलिसांनी रवी याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सांगितले की, त्याच्यासोबत राहत असलेली महिला सुवर्णा हिला तीन दिवसांपूर्वी (दि. 15) किरकोळ कारणातून झालेल्या वादातून वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घरात लपवून ठेवला होता. परंतु दुर्गंधी पसरत असल्याचे लक्षात येताच वडील रमेश यांच्या मदतीने रिक्षातून पहाटेच्या वेळी (दि. 18) लोहगाव स्मशानभूमीच्या परिसरात मृतदेह फेकून दिला. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे निरीक्षक शरद शळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, कर्मचारी शैलेश नाईक, उमेश धेंडे, योगेश थोपटे, सचिन जगदाळे, शंकर वाघुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.