PMC Property Tax: पुणे महापालिकेचे मिळकतकर पोर्टल दोनदा ठप्प; शेवटच्या दिवशी करदात्यांची धावपळ

सवलत योजनेच्या अंतिम मुदतीपूर्वी 5.77 लाख नागरिकांकडून 1090 कोटींचा करभरणा; ऑनलाइन सिस्टीमवर प्रचंड ताण
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: मिळकतकर भरण्यावर मिळणाऱ्या विशेष सवलतीची मुदत संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन कर भरण्यास पसंती दिली. मात्र, नागरिकांच्या वाढलेल्या प्रतिसादामुळे महापालिकेच्या मिळकतकर संकेतस्थळावरील सर्व्हरवर प्रचंड ताण निर्माण झाला आणि संकेतस्थळ दोन वेळा बंद पडल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे कर भरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, 30 मेपर्यंत 5 लाख 77 हजार 497 मिळकतधारकांनी 1090 कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे.

Property Tax
Marathi Theatre Discussion: मराठी रंगभूमीला नव्या दिशेची गरज; श्रीराम लागू नाट्य महोत्सवात रंगले विचारमंथन

महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षासाठी मुदतीपूर्वी संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना 5 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी शेवटच्या टप्प्यात ऑनलाइन कर भरण्यावर भर दिला. परिणामी, महापालिकेच्या अधिकृत मिळकतकर पोर्टलवर अचानक वाढलेल्या ताणामुळे संकेतस्थळ संथ झाले व काही काळासाठी पूर्णपणे बंद पडले.

Property Tax
Pune Census 2027 Action: जनगणना कामात हलगर्जीपणा; हडपसर-मांजरीतील 25 प्रगणकांवर गुन्हे दाखल

परिणामी अनेक नागरिकांना पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. काहींना व्यवहार अर्धवट राहिल्याने पुन्हा प्रयत्न करावे लागले. यामुळे नागरिकांत संभमाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत अनेकांनी सोशल मीडियावर आणि महापालिकेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने संकेतस्थळाच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले. वेबसाईट सुरू नसल्यास नागरिकांना जवळच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

Property Tax
PMC Road Work Fine: धायरीतील निकृष्ट रस्ताकामावर महापालिकेची कारवाई; ठेकेदाराला 10 लाखांचा दंड

58 दिवसांत 5 लाख 77 हजार 497 पुणेकरांनी केला करभरणा

महापालिकेच्या कर आकारणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सवलत योजनेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गेल्या 58 दिवसांत तब्बल 1090 कोटी रुपयांहून अधिक महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. 5 लाख 77 हजार 497 नागरिकांनी कर भरला आहे. यात 1 लाख 1 हजार 399 नागरिकांनी 93 कोटी रुपयांचा रोख कर भरणा केला आहे. तर, 66 हजार 61 नागरिकांनी 301 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. मात्र, 4 लाख 10 हजार 55 नागरिकांनी 695 कोटी रुपयांचा ऑनलाइन कर भरणा केला आहे. सवलतीत कर भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी वाढलेल्या तांत्रिक ताणामुळे संकेतस्थळ कोलमडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Property Tax
CBSE Revaluation 2026: सीबीएसई बारावी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा

मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन कर भरण्यास पसंती दिल्याने महापालिकेच्या सर्व्हरवर ताण आला होता. यामुळे दोन वेळा साईट मंदावली होती. मात्र, काही वेळाने साईट पुन्हा व्यवस्थित सुरू झाली. मुदत वाढ देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. आचारसंहिता सुरू असल्याने आयुक्तांशी चर्चा करून सोमवारी याबाबत निर्णय घेण्यात येईल

ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news