

पुणे: जनगणनेच्या कार्यासाठी नियक्ती असतानाही गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाने कठोर पाऊल उचलत 25 प्रगणकांवर गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे, ही कारवाई होताच संबंधित सर्व कर्मचारी तत्काळ कामावर रुजू झाले. भविष्यातही जनगणना कार्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे सहायक आयुक्त रवी खंदारे यांनी दिला.
देशव्यापी जनगणना 2027 प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात घरगुती यादी तयार करण्याचे काम शहरात सुरू आहे. या कामासाठी आवश्यक ‘जनगणना किट’ स्वीकारून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला नसल्याने सर्वेक्षणाच्या गतीवर परिणाम होत होता. त्यामुळे प्रशासनाने गैरहजर कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जनगणनेचे काम 883 ब्लॉकमध्ये करण्यात येत असून, त्यासाठी 883 प्रगणक आणि 144 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयांतील काही कर्मचारी नियुक्ती असूनही कामावर उपस्थित राहत नव्हते.
वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने क्षेत्रीय कार्यालयाने गुरुवारी अशा 25 कर्मचाऱ्यांविरोधात हडपसर पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल केले. या कारवाईची माहिती मिळताच संबंधित सर्व कर्मचारी शुक्रवारी जनगणना कामासाठी उपस्थित झाले.
जनगणनेसारख्या राष्ट्रीय उपक्रमात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामकाजात अडथळा आणणाऱ्या, जबाबदारी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात यापुढेही कायदेशीर कारवाईची भूमिका कायम ठेवली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे काम आहे. नियुक्ती असूनही काही कर्मचारी कामावर हजर राहत नव्हते. वरिष्ठांच्या निर्देशानुसार त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाई होताच सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. भविष्यातही कामात दिरंगाई करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारची कठोर भूमिका घेतली जाईल.
रवी खंदारे, अधिकारी, महापालिका.