

पुणे: मराठी रंगभूमीची मुख्य धारा करमणुकीच्या चौकटीत रमली आहे. मात्र, मानवी जगणे समजून घेण्याच्या प्रक्रियेकडे रंगभूमीची वाटचाल होणे अपेक्षित आहे. स्मृतिरंजनापलीकडे जाऊन, नव्या काळाची आव्हाने पेलणाऱ्या कलात्मक रंगभूमीची दिशा आता अपेक्षित आहे, असा सूर रंगभूमीविषयक परिसंवादात येथे उमटला.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीयांच्या वतीने आयोजित पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘मराठी रंगभूमी : काल, आज उद्या’ या विषयावर सत्र आयोजित केले होते. चार सत्रांमध्ये झालेल्या या परिसंवादात स्पर्धा रंगभूमी, अव्यावसायिक, व्यावसायिक आणि उद्याची रंगभूमी असे विषय केंद्रस्थानी धरून चर्चा झाली.
त्यामध्ये इरफान मुजावर, डॉ. अनिल बांदिवडेकर, हेमंत एदलाबादकर, हिमांशू स्मार्त, पराग घोंगे, दिलीप जगताप, शेखर ढवळीकर, क्षितिज पटवर्धन, चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम बेर्डे, इरावती कर्णिक आणि चंद्रशेखर फणसळकर यांनी भाग घेतला.
पहिल्या सत्रात स्पर्धा रंगभूमीच्या संदर्भात पारितोषिक महत्त्वाचे की आनंद महत्त्वाचा, असा मुद्दा उपस्थित करून युवा रंगकर्मींना प्रशिक्षित होण्यास साह्य करणाऱ्या स्पर्धात्मक रंगभूमीची आवश्यकता अधोरेखित झाली. अव्यावसायिक रंगभूमीवरील चर्चेत प्रस्थापित साचे तोडण्यावर भर दिला पाहिजे आणि नव्या तसेच वेगळ्या पद्धतीने प्रयोग करून पाहण्याची गरज आहे.
मात्र, ही प्रक्रिया संथ असल्याचे मत व्यक्त झाले. शेवटच्या सत्रात मराठी रंगभूमीच्या भावी काळाविषयी चर्चा रंगली. सर्वार्थाने दमदारपणा असलेला नाटककार नसणे, तत्त्वज्ञानात्मक सांस्कृतिक कृती नसल्याचे वास्तव, जगणं समजून घेण्याची प्रक्रिया बाजूला पडणे, समीक्षक नसल्याचे वास्तव, सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा अभाव, अशा मुद्द्यांना या सत्रात स्पर्श करण्यात आला. रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी या संपूर्ण परिसंवादाचे संचलन केले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आदी उपस्थित होते.