

शिवनगर: ऊस उत्पादन खर्च आणि चालू हंगामातील साखरविक्रीचा दर पाहता माळेगाव साखर कारखान्याने पहिली उचल 3500 रुपये प्रतिटन द्यावी, अशी मागणी करत कष्टकरी शेतकरी समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
माळेगाव कारखान्याने सभासदांना 3300 रुपये प्रतिटन ही पहिली उचल दिली आहे. मात्र, त्यावर असमाधान व्यक्त करत कष्टकरी शेतकरी समितीने बुधवारी (दि. 10) कारखाना कार्यस्थळावर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. तसेच विस्तारीकरणाच्या प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे 12.5 टक्के साखर रिकव्हरी का येत नाही? याचा खुलासा करावा, अशी मागणीही समितीने यावेळी केली आहे.
यावेळी अरविंद बनसोडे, दशरथ राऊत, विनोद जगताप, पोपट निगडे, अमित जगताप, विलास सस्ते, सुखदेव जाधव, हनुमंत तावरे, उदयसिंह फडतरे, पोपट कोकरे, भारत देवकाते, मिथुन आटोळे, शैलेश दंडवते, इंद्रसेन आटोळे, संदीप चोपडे, नाना आटोळे, बाळासाहेब घुटे, सोपान देवकाते, अप्पासाहेब लोखंडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे साखर कामगारांची 10 टक्के पगारवाढ फरकासह लागू करावी, महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी धोरणानुसार ऊसबिलाच्या रकमेतून कपात न करता सभासदांच्या बँक खात्यावर सर्व रक्कम जमा करावी, चांगल्या दराने साखर विक्री होण्यासाठी उच्च दर्जाच्या पीपी बॅग्स वापराव्यात, तसेच कारखाना संचालित असलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या घटनेत बदल करून कारखाना सभासदांना संलग्न सभासद करून घ्यावे आदी मागण्या यावेळी समितीच्या वतीने कारखाना प्रशासनाकडे करण्यात आल्या. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीताताई कोकरे व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सदरच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे.
माळेगाव हा राज्यात अग््रागण्य आणि उच्चांकी ऊस दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. यंदा कारखान्याने दिलेली 3300 रुपये प्रतिटन ही पहिली उचल असून, हे अंतिम पेमेंट नाही. तसेच कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या शिफारशीनुसार 10 टक्के पगारवाढ देण्याच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे.
संगीता कोकरे, उपाध्यक्षा, माळेगाव कारखाना