

पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात जमिनीच्या ताबा मूळ वतनदारांना मिळण्याबाबत शीतल तेजवानीने केलेल्या अर्जावर तत्काळ सुनावणी घेऊन अर्जात नमूद केल्याप्रमाणे कब्जा हक्काच्या सार्याची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावावी, अशा मागणीचा अर्ज अमेडिया कंपनीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. हा अर्ज पार्थ पवार यांनी केला असून, जमीन मिळवण्यासाठी पार्थ पवार यांनी चार वर्षांपासून स्वतः पाठपुरावा केला असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
कुंभार म्हणाले, मुंढवा येथील सर्व्हे नं. ८८ या मिळकतीचा ताबा योग्य सारा स्वीकारून सातबार्यावर मूळ वतनदारांची नावे लावण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज शीतल तेजवानीने १० नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. १५ डिसेंबर २०२० रोजी हा अर्ज हवेली तहसीलदार यांच्याकडे वर्ग करत, अर्जातील मिळकतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असा आदेश दिला. मात्र, १५ डिसेंबर २०२० पासून या अर्जाबाबत काहीही कारवाई झाली नाही. दरम्यान, २८ डिसेंबर २०२० रोजी अमेडिया कंपनीची स्थापना झाली.
अमेडिया कंपनीने १ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कुळकायदा शाखेकडे अर्ज करत तेवजानी यांनी केलेल्या अर्जावर तत्काळ सुनावणी घेऊन सार्याची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावण्यात यावी, अशी मागणी केली. या अर्जानंतर कुळकायदा शाखेने ११ जून २०२१ रोजी तेजवानी हिला खुलासा सादर करण्यास सांगितले. त्यावर तेवजानीने २३ जून २०२१ रोजी खुलासापत्र देऊन सारा भरवून नोंदणी करण्याची मागणी केली. २०२१ नंतर थेट ३० डिसेंबर २०२४ मध्ये कब्जा हक्काची रक्कम भरली. त्यानंतर २०२५ मध्ये या मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले. त्यानंतर अमेडिया कंपनीने मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयन्त केला, अशी माहिती कुंभार यांनी दिली.
४ ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी या जमिनीचा गैरव्यवहार हा उजेडात आला होता. या सर्व प्रकारानंतर देखील ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा अमेडिया कंपनीतर्फे जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले असून, त्यामध्ये आम्ही कायदेशीर पैसे भरून संबंधित जमीन घेतली आहे. मात्र, वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे आम्ही व्यथीत झालो असून, कंपनीची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावी, अशी मागणी या पत्रामध्ये केली आहे. या पत्रावर देखील पार्थ पवार यांची सही आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग उघड होत आहे, असा आरोप कुंभार यांनी केला आहे.
ही कागदपत्रे प्रशासनाकडे उपलब्ध असूनही पार्थ पवार यांचा प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगून पांघरूण टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासन जाणूनबूजून मूळ आरोपीपर्यंत पोहोचण्यास उशीर करत आहे. प्रशासनाने या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करावी, तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी धोरण आखावे, अशी मागणीही कुंभार यांनी केली.
मुंढवा येथील शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी हिला अटक झाली. काल तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेजवानी तपासाला सहकार्य करत नसल्याचे सांगून पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तेजवानी हिला अटक झाल्यानंतर मोठे काही तरी निष्पन्न होईल असं वाटलं होतं. हे प्रकरण कितीही मोठ असलं तरी या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव पुढे येऊ न देणे, राजकीय नेते, त्यांच्या मुलांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने फारसा तपास न करता हे प्रकरण गुंडाळण्याची भूमिका पोलिस आणि प्रशासनाची होती, त्यामुळे संशय बळावतोय.