Pune News : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाचा मार्ग मोकळा

Pune News : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाचा मार्ग मोकळा
पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येणार्‍या आद्यक्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिका प्रशासनाने तयार केलेला आराखड्यासह खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या स्मारकासाठी निविदा काढली जाणार आहे.  संगमवाडी येथील स. नं. 52 पार्ट, 54 पार्ट येथे आद्यक्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची समाधी आहे. या ठिकाणी लहूजींचे स्मारक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
त्यानुसार महापालिकेने या ठिकाणी स्मारक साकार करण्याचे नियोजन केले आहे. या स्मारकाचा आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला असून तो शुक्रवारी झालेल्या बैठकीत अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे आठवडाभरात या स्मारकासाठी निविदा काढली जाणार आहे.  यामध्ये लहूजींचा 35 फूट उंच पुतळा, समाधीवर मेघडंबरी, संपूर्ण जागेस आठ फूट उंच सीमाभिंत आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
या स्मारकासाठी 115 कोटी खर्च अपेक्षित असून स्थापत्य, विद्युतविषयक कामे पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. या टप्प्यातील कामांसाठी 82 कोटी 65 लाखांच्या पूर्वगणन पत्रकास महापालिका आयुक्तांच्या तांत्रिक समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे पुढील आठवडाभरात कामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत.

आराखड्यात काय आहे ?

  • तीन मजल्यांची 120 गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था
  • बहुउद्देशीय सभागृह
  • कॅन्टिन, स्टाफ क्वार्टर इमारत (तळमजल्यासह तीन मजले)
  • मुलांसाठी पाच मजली होस्टेल
  • मुलींसाठी  पाच मजली होस्टेल
  • म्युझियम व आर्ट गॅलरी
  • प्रशासकीय इमारत
  • दोन मजली शारीरिक प्रशिक्षण केंद्र
  • तीन मजली संशोधन व विकास केंद्र
  • सार्वजनिक स्वच्छतागृह
संगमवाडी येथील नियोजित आद्यक्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारकाचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच काम सुरू केले जाणार असून, यासाठी आठवडाभरात निविदा काढली जाणार आहे.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news