

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनानंतर खडबडून जागे झालेले प्रशासन मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी सरसावले आहे. वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम घिसर येथील शेतकर्याला काही तासांत कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. त्या आधारे काही क्षणातच या शेतकर्याला इतर मागासवर्गीय शेतकरी म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभही मिळाला. सुनील सदाशिव धिंडले असे या शेतकर्याचे नाव आहे.
महसूल विभागाने वेगवान कार्यवाही करीत कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले. तहसील कार्यालयात भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 3) दुपारी धिंडले यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी तहसीलदार दिनेश पारगे, तालुका भाजपचे अध्यक्ष आनंद देशमाने उपस्थित होते. धिंडले यांनी गुरुवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता. धिंडले यांचे घर अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाले होते. यासाठी त्यांनी पंचायत समितीकडे अर्ज केला होता.
खुल्या प्रवर्गात सर्व घरांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने धिंडले यांना लाभ मिळाला नाही. मात्र, इतर मागासवर्गीय प्रवर्गात घरे शिल्लक असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पकंज शेळके यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर धिंडले यांच्यासह देशमाने यांनी तहसीलदार पारगे यांच्याकडे धाव घेतली.
पारगे यांनी तातडीने सूचना देऊन तहसील कार्यालयातील रेकॉर्डमधील घिसर गावातील बि—टिश राजवटीतील कागदपत्रांचा शोध घेतला असता धिंडले यांचे आजोबा, पणजोबा व इतर सर्व नातेवाइकांच्या नोंदी कुणबी असल्याचे आढळले. त्याआधारे नागरी सुविधा केंद्रात ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला. त्याची प्रत भोर येथील उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात आली. उपविभागीय अधिकारी कचरे हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी वेल्हे तहसील कचेरीत आले होते. त्यांनी तातडीने धिंडले यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले.
महसूल व पंचायत विभागाच्या तत्परतेमुळे तातडीने कुठल्याही मध्यस्थाविना दाखला मिळाला.
– आनंद देशमाने, वेल्हे तालुकाध्यक्ष, भाजप
मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी सोमवार (दि. 6) पासून तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे.
– दिनेश पारगे,
तहसीलदार, वेल्हे
हेही वाचा