

बाणेर: दोन दशकांहून अधिक काळ रखडलेल्या पाषाण-बाणेर लिंक रोडवरील ३६ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामाचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामासह प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाषाण-बाणेर लिंक रोडच्या भूसंपादनासाठी महापालिकेने सुमारे ७० कोटी रुपये अदा केले आहेत. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आणि नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या प्रयत्नांतून गेल्या २१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मयुरी कोकाटे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभागातील विविध विकासकामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून प्रभागातील रस्ते, पदपथ, पथदिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बुद्धविहार, क्रीडांगणे, नाल्यांच्या संरक्षक भिंती आणि स्मशानभूमींचा विकास आदी कामे करण्यात येणार आहे.
सुतारवाडीचा मुख्य रस्ता, सुसगाव व म्हाळुंगे गावातील मुख्य रस्ते, सूसखिंडीतील ग्रेड सेपरेटर तसेच महामार्गालगतचे सर्व्हिस रोड ही कामेही लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे या वेळी भाजप नेते राहुल कोकाटे यांनी सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, उमा गाडगीळ, वैदही बापट, प्रवीण आमले, मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे, रोहन कोकाटे, शिवकुमार गोयल, प्रशांत खिंवसरा, विनोद दीक्षित, पुष्कर कुलकर्णी, मनीष मिश्रा, तपस कुमार, अरुण वराडे, रत्नाकर मानकर, हरीश पवार, संजीवनी आवटी, सारिका पत्की आदींसह नागरिक उपस्थित होते.