

वेल्हे: पुणे बाह्यवळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाच्या कामगार वसाहतीचे मैलापाणी ओढ्यातून थेट खडकवासला धरणात सोडले जात आहे. हा प्रकार पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे (ता. हवेली) येथे अनेक दिवसांपासून सुरू आहे.
मैला पाण्याचे मोठे तळे वरदाडे व मालखेड गावच्या ओढ्यावर बांधलेल्या बंधाऱ्यात साठले आहे. त्यासाठी थेट ओढ्यात मोठा खड्डा खोदला आहे. मैला पाण्याचे टँकर ओढ्यात जाण्यासाठी जेसीबीने थेट रस्ता तयार करण्यात आला आहे. काळ्या-पिवळसर रंगाच्या दुर्गंधीयुक्त विषारी पाण्यामुळे ओढ्यांसह धरणातील जलचर प्राणी, पशुपक्षांच्या तसेच जनावरे व माणसांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
माणसांची वर्दळ कमी झाल्यानंतर सायंकाळनंतर मैला पाण्याचे टँकर ओढ्यात सोडले जात आहेत.
पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथे रिंग रोड प्रकल्पाची कामगार वसाहत तसेच रेडी मिक्सर प्लॅन्ट व बांधकाम साहित्य उभारणीचा प्रकल्प आहे. रात्रं-दिवस काम करणारे जवळपास ८०० पेक्षा अधिक कामगार आहेत. तेथील हे मैला पाणी असल्याचे दिसून येत आहे.
वरदाडे-मालखेड येथील ओढ्यातील बंधाऱ्यात मैला पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मैला पाणी वाहून खडकवासला धरणात मिसळत आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग