

वेल्हे: पानशेत भागात चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. मागील ५ दिवसांत चोरट्यांनी पानशेत, डावजे भागातील ४ विद्युत रोहित्र लक्ष्य करत त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करून रोहित्रांचे नुकसान केले आहे.
पानशेत जलविद्युत केंद्र येथील १, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या हॉटेल परिसरातील १ तसेच डावजे (ता. मुळशी) येथील निळकंठेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील २ रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरट्यांनी काढून चोरी केली. या घटनेमुळे महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरातील वीजपुरवठ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रोहित्र उघडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्या. या तांब्याला बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने अशा प्रकारच्या चोऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. चोरीला गेलेल्या तांब्याच्या तारांची किंमत आणि रोहित्र दुरुस्तीचा खर्च पाहता, महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे पानशेत शाखेचे कनिष्ठ अभियंता युवराज इंदलकर, कर्मचारी बळवंत गंधारे व कर्मचाऱ्यांनी पानशेत व पौड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याची भीती----
अतिदुर्गम भागात असलेल्या या रोहित्रामधील चोरीमुळे परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याची किंवा अनियमित होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. रोहित्र सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या भागात रहदारी कमी असते, याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या रोहित्रांना लक्ष्य केले आहे.
युवराज इंदलकर, कनिष्ठ अभियंता, महावितरण पानशेत शाखा
या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य माहितीच्या आधारे चोरांच्या टोळीचा शोध घेण्यात येणार आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी रात्र गस्तीत वाढ करण्यात आली आहे.
किशोर शेवते, सहायक पोलिस निरीक्षक, वेल्हे पोलिस ठाणे