

खडकवासला: पानशेत धरण परिसरासह मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील बेकायदा बांधकामे, अतिक्रमणांवर सलग दहाव्या दिवशीही गुरुवारी (दि.20) जलसंपदा विभागाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून कारवाई केली. दिवसभरात दहा हॉटेल, रिसॉर्टसह वीस टपऱ्या अशी तीस अतिक्रमणे भुईसपाट करून जलसंपदा विभागाच्या सरकारी मालकीची जमीन मोकळी करण्यात आली.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्या नेतृत्वाखालील जेसीबी मशीनसह पथकाने अतिक्रमणे भुईसपाट करण्याची धडक मोहीम सुरू केल्याने हॉटेल, रिसॉर्ट फार्म हाऊस, टपऱ्या मालकांनी दोन दिवसांत स्वतःहून बांधकामे काढून घेण्याबाबत विनवणी केली आहे. त्यामुळे त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली.
उपविभागीय अभियंता मोहन भदाणे, वरसगाव धरणाच्या शाखा अभियंता प्रतिक्षा रावण मारके, पानशेत धरणाचे शाखा अभियंता रोहन धामणे यांच्यासह पोलिस, महसूल आदी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दबंग कारवाईचा मोठा धसका पानशेत, वरसगाव धरण परिसरातील अतिक्रमण धारकांनी घेतला आहे. बड्या राजकीय नेत्यांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी थेट दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातच बेकायदा अलिशान रिसॉर्ट, हॉटेल, बंगले उभारले आहेत.
राज्य सरकारने जलसंपदा विभागाला अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, भूमिअभिलेख आदी विभागांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रथमच जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण कारवाईत विविध विभागांचे अधिकारी, सुरक्षारक्षक कर्मचारी सहभागी झाले होते.
दोन्ही धरणांकडे जाणाऱ्या मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील वीस टपऱ्या, दुकाने तसेच रस्त्यावरील तसेच धरण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या जमिनींवर दहा हॉटेल, रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली. काही हॉटेल मालकांनी दोन दिवसांत स्वतःहून बांधकामे काढण्याबाबत विनंती केली आहे. त्यामुळे त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग