

पिंपरखेड: बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या वनमंत्र्यांनी सुचवलेल्या एका अजब उपायामुळे शेतकरी वर्गात तीव नाराजी पसरली आहे. बिबट्यांना मानवी वस्तीत येण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना भक्ष्य म्हणून कोंबड्या, बकरे आणि शेळ्या खाऊ घालण्याचे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर सांगून ते अंमलात आणणार, असे सांगितले होते; मात्र ‘बिबटमुक्त परिसर’ करण्याची मागणी असताना या निर्णयावर शेतकऱ्यांनी तीव आक्षेप घेतला असून, हा उपाय नव्हे, तर संकटांना आमंत्रण देणारा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये 25 लाख रुपयांचा होणारा खर्च शेळ्या, बकरे खरेदी करून बिबट असलेल्या भागात सोडणार आहे. हल्ले कमी करण्यासाठी वनमंत्र्यांनी हा अजब ’शेळी’ उपाय सुचवला आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी बैठकीत उपाययोजना ठरल्या.त्यामध्ये बिबट्यांना आयते खाद्य देऊन सरकार बिबट्यांना पोसणार असल्याने बिबट मुक्त परिसर होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जंगलात किंवा ऊस शेतीत बिबट्यांसाठी कोंबड्या, बकरे आणि शेळ्या खाद्य म्हणून उपलब्ध करून दिले तर ते मानवी वस्तीकडे येणे कमी करतील, ज्यामुळे हल्ले थांबतील असा उद्देश शासनाचा आहे. बिबट्यांना आयते भक्ष्य दिले जाणार असून याला शेतकऱ्यांचा तीव आक्षेप असून आणि वनमंत्र्यांच्या या अजब उपायावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न :
(1) बिबट्याचा अधिवास जंगल नसून उसाचे पीक आहे त्यामुळे शेळ्या सोडणार कुठे? : बिबट्या जंगलाऐवजी सध्या उसाच्या शेतात आहे. या भागात ऊस शेतीचे क्षेत्र मोठे आहे. उसाच्या शेतात शेळ्या सोडल्यास त्या शेळ्या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतातून इतर शेतात जाणार नाहीत का?
(2) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही का? : बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी भक्ष म्हणून सोडलेल्या शेळ्या शेतीमालाचे नुकसान करतील. म्हणजेच बिबट्यापासून वाचवताना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणार त्याला जबाबदार कोण?
(3) बिबट्या शेळी मागे घरापर्यंत येणार नाही का? : शेळी हा प्राणी सहसा मानवी वस्तीच्या किंवा घराच्या आसपास आसरा घेतो. जर बिबट्याला आयते खाद्य म्हणून शेळ्या उपलब्ध करून दिल्या, तर तो त्या शेळ्यांचा पाठलाग करत घरांपर्यंत पोहोचेल. अशावेळी माणसांवर हल्ला होण्याची शक्यता कमी न होता उलट वाढेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
(4) आयते खाद्य देऊन बिबटे पोसणार? : बिबट्यांना आयते खाद्य पुरवून सरकार एक प्रकारे त्यांचे पोषण करत आहे. यामुळे बिबट्याला मानवावर अवलंबून राहण्याची सवय लागेल आणि त्यांची संख्या अधिक झपाट्याने वाढू शकते. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर संकटाच्या रूपाने होईल.
(5) बिबट्याऐवजी शिकारी दुसरेच करणार नाही का? : जंगलात सोडलेल्या शेळ्यांची शिकार बिबट्याऐवजी इतर हिंस्त्र प्राणी किंवा अगदी मानवी (चोरी) शिकार देखील करू शकतात. त्यामुळे मूळ उद्देश साध्य न होता सरकारी तिजोरीतील पैशांचा अपव्यय होईल.
(6) शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी दुहेरी संकटात? : शेळी खाऊ घालण्याच्या या निर्णयामुळे शेतकरी संभमात पडले आहेत. एकीकडे जीव वाचवण्याची धडपड आणि दुसरीकडे शेती आणि जनावरांच्या नुकसानीची भीती अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.