

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी गुरुवारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. पुण्यात 41 प्रभागात एकूण 35 लाख 51 हजार 469 अधिकृत मतदार असून, या मतदारांना महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. धक्कादायक म्हणजे यात तीन लाखांपेक्षा अधिक मतदार दुबार असल्याचे उघड झाले आहे. या मतदारांना तारांकित करून दुबार मतदान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना जाहीर झाल्यावर आरक्षण सोडत देखील जाहीर केली आहे. निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना देखील निवडणूक आयोगाने दिलेल्या होत्या. महापालिकेच्या निवडणूक शाखेने मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण केले असून, प्रारूप मतदार याद्या या गुरुवारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आल्या. या वेळी निवडणूक अधिकारी उपायुक्त प्रसाद काटकर व रवी पवार उपस्थित होते.
आयुक्त नवल किशोर राम पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, येत्या काळात राज्यात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेता, पुणे शहरातील 41 विभाग आणि त्यांचे आरक्षण आधीच जाहीर केले आहे. शहरातील सर्व 41 विभागांसाठी प्रारूप मतदार यादी आम्ही प्रसिद्ध केली आहे. एकूण 35 लाख 51 हजार 469 नोंदणीकृत मतदार आहेत. 1 जुलै 2025 च्या आधी या मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक मतदार आहेत. यात 1 लाख 60 हजार 242 मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदान असलेला मतदारसंघ 39 अप्पर सुपर इंदिरानगर आहे. या प्रभागात केवळ 62 हजार 205 मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा असला तरी या ठिकाणची मतदार संख्या ही 1 लाख 48 हजार इतकी आहे.
मतदार यादीत असलेली तीन लाख दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगामार्फत सुरू केली जाणार आहे. आयुक्त म्हणाले, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे. मतदारांना 20 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान पुणे महानगरपालिका मुख्य इमारत निवडणूक कार्यालय तसेच सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये या यादीबाबत त्यांचे आक्षेप किंवा सूचना सादर करता येणार आहेत. हरकती आणि सूचनांसाठी अंतिम मुदत 5 डिसेंबर. मतदार यादीच्या प्रारूपावर हरकती आणि सूचना सादर करण्याची अंतिम मुदत 5 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन प्रकारच्या हरकती असतील : अ (वैयक्तिक हरकती) आणि ब (दुसऱ्या व्यक्तीच्या नावाबाबतचा आक्षेप). ई-मेलद्वारे किंवा गटांमध्ये पाठवलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
मतदाराने घ्यावयाच्या हरकतींचे प्रकार -
स्वतः मतदाराने केलेले अर्ज - ज्या मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले असेल त्यांनी नमुना हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत घेतलेली हरकत- ज्या तक्रारदारास अन्य मतदाराबाबत हरकत घ्यायची आहे, त्यांनी नमुना-ब मध्ये मतदाराचे तपशील, त्याचे रहिवासाचे पुरावे तसेच यादी भाग क्रमांकाची प्रत जोडून अर्ज करणे आवश्यक आहे.
एकच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे नमुना मधील अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांच्यामार्फत त्या संस्थेच्या लेटरहेडवर संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या स्वाक्षरीने एकत्रितपणे सादर करता येतील.
कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही.
प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : 27 नोव्हेंबर 2025
हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : 5 डिसेंबर 2025
मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान यादी जाहीर करणे : 8 डिसेंबर 2025
मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : 12 डिसेंबर 2025
उमेदवारांची होणार धावपळ
महापालिकेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप याद्यांमध्ये अनेक प्रभागात मतदार संख्या ही 1 लाखापेक्षा अधिक आहे. एवढ्या मोठ्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उमेदवारांना कामाला लावावे लागणार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 26 लाख मतदार होते. 2024-25 च्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची संख्या ही नऊ लाखांनी वाढली आहे. मतदारांची ही वाढ कोणत्या पक्षाच्या फायद्याची हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
दुबार मतदारांचा पालिका घेणार शोध
महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ला तब्बल 35 लाख 51 हजार मतदार पात्र ठरले आहेत. त्यापैकी 3 लाख 468 दुबार मतदार असल्याने त्यांची नावे चिन्हांकित केली आहेत. ही नावे कमी करण्यासाठी थेट महापालिकेच्या निवडणूक विभागाचे कर्मचारी या मतदारांना भेटणार आहेत. तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून त्यांना कोणत्याही एका ठिकाणी मतदान करण्यास ते पात्र ठरतील, असे सांगून त्यांच्या कडून अर्ज भरून घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्त राम यांनी दिली.