

पुणे: महापालिका ही नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणारी संस्था आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘मिशन मोड’वर काम करायलाच हवे. काम न करणाऱ्यांवर तसेच चुकीचे काम करणाऱ्यांवर मग तो कितीही मोठा अधिकारी असो कारवाई केली जाईल, असा थेट इशारा महापालिका आयुक्त व प्रशासक नवल किशोर राम यांनी गुरुवारी दिला. कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात माझ्याकडे किंवा थेट पोलिसांकडे तक्रार करा, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
वारजे येथे रस्त्याच्या पुनर्डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा व्हिडीओ आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नीलेश वांजळे यांनी प्रसिद्ध केला होता. काही वेळातच डांबराचा पट्टा पापडासारखा उचलता येत असल्याचे दृश्य पाहून नागरिकांत संताप पसरला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ दखल घेत दोन महापालिका अधिकाऱ्यांना निलंबित केले.
मात्र, या अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत महापालिका अभियंता संघाच्या प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी आयुक्त राम यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राम यांनी कमचुकारांना माफी दिली जाणार नाही, असे सांगितले.
आयुक्त राम म्हणाले, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती काम करण्यासाठीच झाली आहे. परंतु अनेक ठिकाणी निधी उपलब्ध असतानाही काम रेंगाळते. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जाते. काही वेळा अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करून काम थांबविण्याचे प्रकारही समोर आले आहेत. असे होत असेल तर माझ्याकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करा. पण कामात ढिलाई अजिबात सहन केली जाणार नाही. निकृष्ट काम किंवा निधी असूनही काम न करणे, या गोष्टींमुळे प्रशासनाची व शहराची बदनामी होत आहे.
अहवालानंतर पुढील निर्णय
वारजे येथील दर्जाहीन डांबरीकरणाबाबतची चौकशी परिमंडळ उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.