

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू होते. मात्र, काही महिन्यांपासून हे काम पूर्णपणे ठप्प झाले असून, खोदलेल्या रस्त्यांची झालेली दुर्दशा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाइपलाइन टाकून झालेले काँक्रीट रस्ते पूर्ववत करण्यात न आल्याने वाहनधारकांना अपघातांचा धोका वाढला आहे.
ओतूर गावठाणातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाजवळील तीव उतारावर पाइपलाइनसाठी खोदलेले चर तसेच पडले आहेत. या ठिकाणी दुचाकी अपघातांची संख्या वाढत असून, दि. 29 नोव्हेंबर रोजी शांताराम राणूजी बटवाल (71) हे दुचाकीसह पडून जखमी झाले. यासारखे अपघात सतत होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
काम बंद असल्याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत आहे. ग्रामपंचायत कार्यालयानेही ठेकेदाराशी संपर्क होत नसल्याची पुष्टी केली असून उपसरपंच प्रशांत डुंबरे यांनाही असा अनुभव आला आहे.
खोदलेले रस्ते दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करावेत. गलिच्छ गटारीतून पाइपलाइन नेऊ नये. तसेच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग््राामस्थांकडून होत आहे.
खामुंडी ते बदगी रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ही दुर्गंधीयुक्त वाहत्या सांडपाण्याच्या गटारीतून टाकण्यात आली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याचा धोका निर्माण झाला असून, ’जलजीवन दिले की जलमरण?’ असा सवाल ग््राामस्थांमधून उपस्थित होत आहे.
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावोगाव बांधण्यात आलेले मजबूत व आकर्षक काँक्रीट रस्ते आज जलजीवन मिशनमुळे उखडून टाकण्यात आले आहेत. फोडलेले रस्ते पुन्हा पूर्ववत करताना दर्जेदार काम न केल्याने रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. ठेकेदार जबाबदारी टाळून स्वतः उपस्थित नसल्याने ’या कामावर देखरेख अखेर कोणाची?’ हा प्रश्न अनुत्तरीत आहे