Onion Price Crash: कांद्याचे भाव कोसळले; पुणे-अहिल्यानगरातील शेतकरी आर्थिक संकटात

उत्पादन खर्च दुप्पट, दर मात्र कवडीमोल; शेती साहित्यांच्या दरवाढीने अडचणीत वाढ
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या कांदा काढणी सुरू असून, बाजारभाव घसरल्याने शेतकरी हताश झाला आहे. गोळे कांद्याला 10 किलोस 120 ते 125 रुपये, कांदे 80 ते 115 रुपये, गोटी कांदा 40 ते 75 रुपये, तर बदला कांदा 15 ते 35 रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी, धामणी, लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी परिसरातील शेतकरी सध्या कांदा विक्री न करता कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे वळले आहेत.

Onion
Pune Police Suspended: पुण्यात मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन; दोन पोलिस हवालदार निलंबित

इंधन दरवाढीसह मजुरी, मशागत, खते आणि औषधांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने यंदा उत्पादन खर्च गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. मात्र, सध्याच्या बाजारभावातून हा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या कांद्याची काढणी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, बाजारात नव्या कांद्याची आवक वाढली आहे.

त्याचबरोबर निर्यात बंदीमुळेही शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बढेकर मळा येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय बढेकर, अशोक बढेकर व भगवान बढेकर यांनीही हीच भावना व्यक्त केली.

पीक कर्जाचे हप्ते, मुलामुलींचे लग्न यांचा खर्चाचा भार शेतकरी वर्गावर आहे. मात्र, अचानक बाजारभाव घसरल्याने या भावात कांदा विकून कर्ज व हप्ते भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळण्याकरिता कांदा चाळीमध्ये साठवून ठेवावा लागणार आहे. शासनाने कांद्याला हमीभाव देण्याची गरज आहे. जर शासनाने हमीभाव दिला तर कांदा उत्पादक शेतकरी जगू शकतात.

संभाजी आदक आणि माऊली मांदळे, कांदा उत्पादक शेतकरी, मांदळेवाडी

Onion
Pune Municipal Junior Engineer Exam: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा जाहीर; 169 जागांसाठी 42 हजार उमेदवार

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे टाकळी भीमा परिसरात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकवला. मात्र, त्याला अपेक्षाप्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये केलेला खर्च व कष्ट वाया गेल्याची भावना आहे.

भीमा नदीच्या पाण्यावर तर काही शेतकऱ्यांनी विहिरींवर मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतले आहे, तर काही शेतकऱ्यांची अजून काढणी सुरू आहे. मात्र, सध्या कांद्याला बाजारभाव केवळ 8 ते 9 रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. उत्पादनाच्या तुलनेत हा दर परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांनी गेली चार महिने कांद्यासाठी कष्ट घेतले. काही शेतकऱ्यांचे कांदा हेच वार्षिक नियोजनाचे मुख्य पीक आहे. आता त्यासाठी केलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, झालेल्या अवकाळी पावासनेही शेतकऱ्याला फटका बसला आहे.

Onion
Pune Revenue Officers: पुण्यात महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत; कलम 155 गैरवापर प्रकरण

गेल्या हंगामातील कांदा अजूनही काही शेतकऱ्यांचा चाळीत पडून आहे, तर काहींनी कवडीमोल बाजारभावाने कांदा विकावा लागला आहे. परिणामी यंदाही शेतकऱ्यांवर मिळेल त्या दरातच कांदा विक्री करण्याची वेळ येणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सध्याला कांद्याचे बाजार भाव कवडीमोल झाल्याने कांदा विकावा की तसाच ठेवावा, या विचारात आहे. घरखर्चाला दुसरे साधन नसल्याने कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे रामातात्या दोरगे, लक्ष्मण दोरगे यांच्यासह इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

आखाती देशातील युद्धाचे दूरगामी परिणाम ग््राामीण भागात तीवतेने जाणवू लागले आहेत. या संघर्षाची झळ थेट शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पोहोचली असून, अवघ्या 15 दिवसांत शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी शेती करणे अधिक खर्चिक बनले असून, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Onion
Pune Crime: पुणे ग्रामीण हादरले; बारामतीत अटक आरोपींकडून साखळी खुनांचा उलगडा

पीव्हीसी पाइपच्या किमतीत तब्बल 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, ड्रीप इरिगेशन साहित्य, व्हॉल्व्ह आणि इतर साधनांमध्ये 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. विद्युत मोटारी 5 ते 8 टक्क्यांनी महागल्या आहेत. मल्चिंग पेपरच्या उत्पादनात घट झाली असून, उपलब्ध साहित्यावरही 20 ते 30 टक्क्यांची दरवाढ दिसून येत आहे.

युद्धामुळे प्लास्टिक, ग््रॉन्युअल्स आणि विविध रासायनिक घटकांच्या दरात वाढ झाली आहे. आयात होणाऱ्या रसायनांचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ही रसायने दीडपट ते दुप्पट महागली आहेत. काही ठिकाणी 50 ते 100 टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे, यामुळे याचा थेट परिणाम शेती औषधांच्या उत्पादनावर झाला असून, द्रवरूप औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी बाजारातील औषधेही महाग झाली आहेत. पावडर स्वरूपातील औषधांमध्ये 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अन्नधान्य, औषधे, हॉटेलसेवा, बांधकाम साहित्य, प्लंबिंग साहित्य, पाण्याच्या टाक्या, सिरॅमिक वस्तू, प्लास्टिक आणि विविध रसायने या सर्वच क्षेत्रांमध्ये दरवाढ झाली आहे. खतांच्या किमतीत प्रतिबॅग 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ‌’शेती टिकवायची कशी?‌’ आणि ‌’वाढत्या खर्चात नफा कसा मिळवायचा?‌’ हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news