

पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार सिनीयर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) विशेष हिवाळी शिबिर दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी मौजे नायगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे उत्साहात सुरू झाले. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कामांमधून जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
या विशेष हिवाळी शिबिरात ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वैद्यकीय शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंधारण, आपत्ती व्यवस्थापन तसेच सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यासोबतच समाजप्रबोधनासाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. अली माळेगावकर, प्रा. उमर वासिल आणि डॉ. नाजिया शेख यांनी केले आहे.
उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शैला बुटवाला, अधिष्ठाता डॉ. एम. जी. मुल्ला, सौ. शकीला सिध्दवतम आणि मुख्य परीक्षा अधिकारी डॉ. आफताब आलम यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा देत समाजकार्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. आशाताईं खिसे, ग्रामपंचायत सदस्य सौ. निलोफर सय्यद, माजी सरपंच व नायगाव विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत चोंडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष अजिंक्य कड, मंगेश चोंडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांनी शिबिरकाळात सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिबिराच्या उपक्रमांमध्ये प्रा. प्रिया तलवार, प्रा. खदिजा लोकंडवाला, प्रा. निशा परविन शेख, प्रा. नईम सय्यद, प्रा. यशवंत मडके, प्रा. मोहम्मद शरीफ, प्रा. कामील खान आणि प्रा. अनीस पानगल यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती चौधरी आणि शीफा मुलाणी यांनी केले, तर सलाउद्दीन शेख, रेहान दावतखाणी आणि जाकेर खानमियाँ यांनी शिबिराचे उत्तम व्यवस्थापन सांभाळले. या हिवाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाशी थेट संपर्क साधण्याची, सामाजिक जाणीव वाढवण्याची आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची संधी मिळणार आहे.