

वेल्हे: खडकवासला, पानशेत वरसगाव धरण क्षेत्रासह मुठा कालवा परिसरातील उर्वरित अतिक्रमणे लवकरच हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार सरकारी मालकीच्या अतिक्रमणबाधित क्षेत्राची मोजणी करण्यात येणार आहे.
गेल्या दोन महिन्यांत खडकवासला जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला, पानशेत व वरसगाव धरण क्षेत्रासह मुठा कालव्याच्या परिसरातील सरकारी जमिनीवरील तब्बल एक हजारांहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. यात थेट पाणलोट क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अलिशान बंगले, हॉटेल, रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामासह धरण तीरावरील चौपाटी, दुकाने, कालव्याच्या परिसरातील झोपड्या बांधकामे आदींचा समावेश आहे.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, शासनाने सरकारी मालकीच्या जमिनीवरील सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महसूल, पोलिस, महापालिका आदी विभागांची मदत घेतली आहे. अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमण बाधित क्षेत्राची हद्द निश्चित व्हावी यासाठी लवकरच या जागांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. जलसंपदा विभागाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. टपऱ्या, दुकानांसह राजकीय नेते, भांडवलदाराची बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीपासून दोन्ही बाजूंच्या धरण क्षेत्रात जलसंपदा विभागाच्या संपादित जमिनीवर केलेली बेकायदा बांधकामे जेसीबी मशिनने जमीनदोस्त केली आहेत. पानशेत, वरसगावमध्ये काही राजकीय नेत्यांनी विरोध न करता स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सहकार्य केले.
पाचशे एकर जागा मोकळी
खडकवासला, पानशेतच्या वरसगावच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुठा कालव्याच्या परिसरात भराव टाकून उभारलेल्या बेकायदा संरक्षण भिंती, रस्ते, बांधकामे, हॉटेल, रिसॉर्टची अतिक्रमणे पाहून जलसंपदाचे अधिकाऱ्यासह पोलिस अधिकारी, प्रशासन अचंबित झाले आहे. दोन महिन्यांत एक हजारावर अतिक्रमणे करून जवळपास पाचशे एकर जमीन मोकळी करण्यात आली आहे.