

निमोणे: शिरूर तालुक्यातील निमोणे येथे वाढदिवसाच्या पार्टीवरून झालेल्या वादातून मित्राचे घर पेटवून त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
याप्रकरणी निखिल ज्ञानदेव काळे (रा. भोसेवाडी रस्ता, निमोणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अक्षय संतोष वाळुंज (वय 21, रा. शिंदोडी, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय वाळुंज व निखिल काळे यांच्या मित्राचा वाढदिवस होता. त्या मित्राने परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. मात्र, त्या पार्टीला निखिल याला बोलवले नव्हते.
दरम्यान, शनिवारी (दि. 3) रात्री अकरा वाजेच्या सुमारास निखिल याच्या घरामागून जाणाऱ्या भोसेवाडी रस्त्यावर तो मित्र व अक्षय वाळुंज यांच्यात वाद झाला. त्यावेळी निखिलने, काय मित्रा मला का नाही पार्टीला बोलावले? अशी तक्रार केली. त्यावर चिडलेल्या अक्षय वाळुंज याने निखिलला मारहाण केले. वादाच्या आवाजाने घरातील इतर सदस्य बाहेर आल्याने निखिल तेथून रागाने निघून गेला. तसेच तुम्हाला जन्माची अद्दल घडवतो, अशी धमकी त्याने दिली.
त्यानंतर रविवारी (दि. 4) मध्यरात्री तीनच्या सुमारास झोपलेल्या निखिल आणि त्याच्या कुटुंबीय मोठा आवाज आल्याने जागे झाले. त्यावेळी त्यांच्या छपराच्या घराला आग लागली होती, तर अक्षय वाळुंज हा मोठ्या आवाजात शिव्या देत, तुम्हाला खतम करून टाकतो अशा धमक्या देत होता. इतर लोकांची चाहूल लागताच तो दुचाकीवरून पळून गेला.
या जळीतकांडात सर्व संसारोपयोगी वस्तू, रोख 50 हजार रुपये, व घरातील सोने असा अंदाजे दोन लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करीत आहेत.