

बारामती: शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशुधनाची चोरी करणाऱ्या तिघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी शिताफीने अटक केली. या चोरट्यांचा छडा लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
अजय ऊर्फ गोविंद सतीश होळकर (रा. होळ, ता. बारामती), आर्यन सचिन माने (रा. निरगुडवाडी, सदोबाचीवाडी, ता. बारामती) व शिवभान ऊर्फ बंटी नंदकुमार घोडके (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सदोबाचीवाडी गावातील इनामवस्ती (होळ रस्ता) येथील संजय जगन्नाथ होळकर यांच्या घराशेजारील जनावरांच्या गोठ्याची लोखंडी जाळी तोडून चोरट्यांनी एक शेळी व चार बोकडांची चोरी केली होती. याप्रकरणी होळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत लागलीच तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शेळ्या, बोकड चोरल्याची कबुली दिली.
या तिघांनाही अटक करत बारामती न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून चोरलेली पाच बोकडे पोलिसांनी परत मिळविली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकींसह 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास हवालदार पोपट नाळे हे करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, हवालदार पोपट नाळे, सागर चौधरी, हृदयनाथ देवकर, महेश पन्हाळे, भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, सूरज धोत्रे, विलास ओमासे आदींनी केली.