

प्रसाद जगताप
पुणे : शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने नव्या विमानतळ टर्मिनलचे प्रवेशद्वार ऐतिहासिक म्हणजेच काही प्रमाणात 'शनिवारवाड्या'प्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पुणेकरांना येथून प्रवास करताना ऐतिहासिक वास्तुकलेचा एक वेगळाच नजराणा पाहता येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 13 एकर जागेबाबत नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे विमानतळाला आता भारतीय हवाई दलाची 13 एकर जागा मिळाल्यामुळे पुणे विमानतळ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. त्याचबरोबर येथून मालवाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आतापर्यंत विमानतळाच्या विस्तारीकरणाचे 68 टक्के काम झाले आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवाशांचा पुणे विमानतळावरील प्रवास सुखकर होणार आहे, असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
पुण्यातील विमानतळावरून पिक अवर्समध्ये देशांतर्गत प्रवास करणार्या प्रवाशांची सरासरी संख्या 600 असून परदेशात प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 200 आहे. नवीन टर्मिनल झाल्यावर पिक अवर्समध्ये देशांतर्गत प्रवास करण्याची सरासरी क्षमता ही 1700 प्रवाशांवर पोहोचणार असून, 600 प्रवासी परदेशात उड्डाण करू शकतील.
आगामी होणार्या टर्मिनलमध्ये बॅगेज हँडलिंग सिस्टिम, उच्च दर्जाचे प्रतीक्षालय, चालकांसाठी प्रसाधनगृह आणि विश्रांतीगृह, ई-वाहनांना चार्जिंग स्टेशनची सुविधा, व्हीआयपींकरिता विशेष सेवा, कार वॉशिंग सुविधा, तातडीची वैद्यकीय सेवा, परिसरात स्वयंचलित वाहतूक व्यवस्था, डिजिटल पेमेंट सुविधा, कॉन्फरन्स रूम आणि ऑफिसेस अशा विविध सुविधा असणार आहेत. येथील डीजी यात्रा सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.