

पुणे: पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचा कारभार पाहण्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केल्या आहेत.
इंदापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद मागील एक महिन्यापासून रिक्त होते. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांसाठी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या चार तालुक्यांची जबाबदारी विठ्ठल शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि हवेली या तालुक्यांसाठी राजेंद्र कोरेकर यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या स्वाक्षरीची नियुक्तीपत्रे तीनही जिल्हाध्यक्षांना पाठविण्यात आली असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी तिघांनी कामाला सुरुवात केली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, त्या ठिकाणी निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना कोणतीही अडचण दिसत नाही.” “पुढील काळात जि. प., पं. स.च्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नसल्याने, या तिघांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.