

वाल्हे: मागील आठवड्यापासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील रब्बी पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीड नियंत्रणासाठी करावी लागणारी वारंवार औषध फवारणी शेतकऱ्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ करत असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मागील दोन महिन्यांपर्यंत रब्बी पिकांना पोषक अशी थंडी होती. मात्र, अलीकडे थंडीचा कडाका कमी होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहू लागले आहे. अवकाळी पावसाची शक्यता आणि सततचे ढगाळ हवामान यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा, तूर तसेच पालेभाज्यांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
सध्या रब्बी हंगामातील बहुतांश पिकांची पेरणी पूर्ण झाली असून काही पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. सर्वत्र पिके जोमात दिसत असली तरी बदलत्या हवामानामुळे रोगराई वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मागील वर्षी तीव पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर यंदा समाधानकारक पावसामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती.
मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे ही अपेक्षा धोक्यात आली आहे. यंदा गहूपिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून, ढगाळ हवामान विविध किडींसाठी पोषक ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गहूपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही अळी सुरुवातीच्या अवस्थेत खोडाच्या आत शिरून नुकसान करते, तर पीक वाढल्यानंतर खोडातील वरचा भाग खाते. परिणामी दाणे न भरताच ओंब्या वाळतात.
खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे वाहून गेली होती किंवा शेतातच कुजली होती. त्या संकटातून सावरत असतानाच आता गहूपिकावर खोडकीड, तांबेरा, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती वाल्हे येथील शेतकरी निशांत भुजबळ यांनी दिली.