

पुणे: राज्यात विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, आयटी हब असणाऱ्या पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, येथील मार्केटच्या समस्या, वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, कचरा समस्यांसह अन्य प्रश्नांचे निराकरण, हे गेली नऊ वर्षे शहराची ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना ते करता आले नाही. त्यांनीच पुण्याचा खेळखंडोबा केला असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता केला. त्यामुळे पुण्याची वाट लावलेल्यांना बाजूला करण्यासाठीच मी या निवडणुकीत भाग घेतला असल्याचे ते म्हणाले.
पुणे मनपाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 13 व प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ नरपतगिरी चौकात बुधवारी (दि. 7) सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी, प्रदीप देशमुख, पक्षाचे उमेदवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराची सत्ता माझ्याकडे असताना मोठे रस्ते, फ्लाय ओव्हरसह विकासकामे केली. परंतु, पुण्यात तसे झालेले नाही. ज्यांच्या हातात 9 वर्षे सत्ता होती, त्यांनी टेंडरमध्ये रिंग केली. काही ठरावीक कंत्राटदारांना डोळ्यांसमोर ठेवून टेंडर काढण्याचे काम केले. खड्डे भरण्यासाठी पाच वर्षांत 1200 कोटी रुपये मनपाकडे होते. त्यातील अवघे 650 कोटी रुपयेच खर्च झालेले आहेत. बाकीचे का खर्च केले नाहीत? पैसा असताना त्यांनी काम केले नाही, हा तर ‘त्या’ राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आहे. ते यशस्वी झाले नाहीत का? असा प्रश्नही पवार यांनी या वेळी बोलताना उपस्थित केला.
पवार म्हणाले...
शहरात कचऱ्याची समस्या मोठी आहे. शहर स्वच्छतेसाठी कागदोपत्री 12 हजार 350 कर्मचारी तैनात असूनही शहर अस्वच्छ आहे. बोगस माणसे दाखवून केवळ पैसे काढण्याचे काम चालले आहे.
पुण्यात माणशी तीनशे लिटर पाणी मिळायला हवे, असे नियोजन आहे. परंतु, पुणेकरांना दररोज पाणी मिळत नाही. कारण, टँकरमाफिया निर्माण झाले असून, जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाहीत. त्यांची झालेली मक्तेदारी आपल्याला मोडायची आहे.
पुणे शहराचा प्रदूषणात देशात चौथा क्रमांक असून, पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सत्ता हाती असलेल्यांनी काही केले नाही. नऊ वर्षे शहराच्या कारभाऱ्यांनी त्यात लक्ष दिल्यानेच समस्या वाढली आहे.
शहर सुधारणांकडे दुर्लक्ष करून त्यांनी निव्वळ टेंडरिंगद्वारे कंत्राटदारांमध्ये रस दाखवत काम केले आहे. कारण, कंत्राटदारांच्या फायद्याच्या अटी त्यांनी त्यात घातल्या, असा कारभार संबंधित राज्यकर्त्यांनी केला आहे. कोयता गँगची दहशत वाढली असून, त्यांची दहशत आपल्याला उपटून टाकायची आहे.
मी अर्थमंत्री असल्याने निधीची काळजी करू नका...
शहरविकासासाठी निधी आणण्याचे काम मी करेन. कारण, राज्याचा अर्थमंत्री मीच असून, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. यापूर्वी मी जागतिक बँक आणि जपानच्या जायकाद्वारे निधी आणला आहे. जवाहरलाल नेहरू अर्बन मिशनमधून मोठा निधी मागे मी माझ्या हाती दहा वर्षांपूर्वी सत्ता असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आणला होता. त्याचा फायदा दोन्ही शहरांना करून दिला आहे. त्यामुळे नुसती भाषणे करून चालत नाही, तर कृती आवश्यक असते, असा टोलाही पवार यांनी विरोधकांना लगावला.