

पुणे: पुणे मेट्रो प्रकल्पाला स्व. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती. त्यानंतरच्या काळात भूमिपूजन झाले, असे सांगत राष्ट्रवादी काँग््रेासचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मेट्रोचे श्रेय घेणाऱ्या भाजपवर टोला लगावला.
पुणे शहरातील मूलभूत सुविधा सातत्याने अपयशी ठरत असून, त्याचा थेट फटका नागरिकांना बसत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी ‘एक अलार्म, पाच कामे’ या संकल्पनेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये कचरा, वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, पाणीटंचाई, गुन्हेगारी आणि ढासळलेली आरोग्य व्यवस्था हे धोक्याचे अलार्म ठरत आहेत. या महत्त्वाच्या पाच समस्या दूर केल्याशिवाय नागरिकांचे समाधान होणार नाही. दोन्ही महापालिकांमध्ये भष्टाचार वाढला आहे. टँकर माफिया वाढले आहेत, आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. अनेक योजना केवळ कागदावरच आहेत.
हजारो सफाई कर्मचारी असल्याचे सांगितले जाते; मात्र शहरभर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. येत्या 10 जानेवारी रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून, केवळ उणिवा दाखवणार नाही तर आम्ही काय करू, हेही त्यामध्ये सांगणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
ज्या वेळी निवडणुका येतात, त्या वेळी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आरोप करणाऱ्यांनी न्यायालयात जावे आणि न्यायालयाकडून न्याय मागावा.
अजित पवार, उपमुख्यमंत्री