पुणे: इन्फ्ल्यूएन्सर अथर्व सुदामे याने विनापरवानगी पीएमपी बसमध्ये रील्स व्हिडीओ केला. यासोबतच त्याने वाहकाचा गणवेश परिधान करत, बॅच बिल्ला आणि ई-तिकीट मशीनचा वापर केला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने सुदामेला आता 50 हजारांचा दंड केला आहे. हा दंड न भरल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत थेट गुन्हा दाखल करणार असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.
पीएमपीच्या बसमध्ये इन्फ्ल्यूएन्सर अथर्व सुदामे याने विनापरवानगी रील्स व्हिडीओचे चित्रीकरण केले. यासोबतच त्याने पीएमपीच्या वाहकाचा गणवेश परिधान केला. तसेच त्याने वाहकाचे ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्ला याचा देखील वापर केला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने त्याला सात दिवसांत पीएमपीच्या स्वारगेट मुख्यालयात हजर राहून खुलासा करण्याचे नोटीसद्वारे सांगितले होते.
मात्र, सात दिवस उलटूनही पीएमपी प्रशासनाला याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने सुदामे याला दुसरी नोटीस बजावत एक इन्स्टाग््रााम व्हिडीओ 25 हजार रुपये, असे दोन रील्स व्हिडीओ बसमध्ये विनापरवानगी काढल्याप्रकरणी 50 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. ही दंडाची रक्कम पीएमपीकडे जमा न केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
पीएमपी प्रशासनाने यापूर्वी 2 जानेवारी 2026 रोजी अथर्वला पहिली नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा मागवला होता. मात्र, विहित मुदतीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता सुदामेला दुसरी नोटीस बजावली आहे. दरम्यान याच सात दिवसांत पीएमपी प्रशासनाने चालक वाहकांनाही एक नोटीस काढली आहे. यात चालक-वाहकांनी स्वत: बसमध्ये रील्स बनवू नये आणि रील्स बनवणाऱ्या इन्फ्ल्यूएन्सरला कोणतेही सहकार्य करू नये, केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे यात म्हटले आहे.
सार्वजनिक मालमत्तेचा आणि महामंडळाच्या अधिकृत वस्तूंचा (गणवेश, बॅच बिल्ला, ई-तिकीट मशिन) व्यावसायिक किंवा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी विनापरवानगी वापर करणे, हा गंभीर गुन्हा आहे. आम्ही संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली होती, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, याकरिता आम्ही संबंधित इन्फ्ल्यूएन्सरला आणखी एक संधी म्हणून 50 हजार रुपयांचा दंड भरण्यासंदर्भात नोटीस काढली आहे. दंड न भरल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.
यशवंत हिंगे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल