Narhe Robbery Case: नऱ्हे दरोडा प्रकरणात पोलिसांना झटका; दोन कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

एक कोटी रोकड लूट कट प्रकरणात न्यायालयाचा निर्णय; आरोपी पोलिसांच्या भूमिकेचा तपास होणार सखोल
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळ एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा कट, व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून स्वतःला पोलिस असल्याची बतावणी आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कथित सहभागामुळे गाजत असलेल्या नऱ्हे दरोडा व खंडणी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलिस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलिस अजीजजब्बार इसुब मेस्त्री यांनी दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुरुषोत्तम चौधरी यांनी फेटाळून लावला.

Police
Maharashtra Engineering Admission 2026: राज्यात २.१६ लाख जागा उपलब्ध; संगणक अभियांत्रिकीला सर्वाधिक मागणी

याप्रकरणी सरकारी पक्षाला याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रथमदर्शनी आरोपींचा इतर संशयितांबरोबर समान उद्देश दिसून येत असल्याचे नमूद करीत न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या आदेशामुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणेला आता या दोघांच्या भूमिकेचा अधिक सखोल तपास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Police
Pune Railway Slum Rehabilitation: पुणे-पिंपरीतील १८ हजार रेल्वे झोपड्यांच्या पुनर्वसनाचा पेच; धोरणाची प्रतीक्षा

काय आहे संपूर्ण प्रकरण..?

तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन भूषण पवार हे १८ जुलै २०२६ रोजी आपल्या कर्मचाऱ्यासह एक कोटी रुपयांची रोकड घेऊन निघाले होते. किरण आपटे यांच्या सांगण्यावरून ही रक्कम एका व्यावसायिकाला देण्यासाठी ते सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल परिसरात पोहचले. तेथून कारने नऱ्हेकडे जात असताना नवले पुलाच्या मध्यभागी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वाहन अडविले. 'आम्ही पोलिस आहोत, तुमच्याकडे काळा पैसा आहे,' असे सांगत त्यांनी रोकड हिसकाविण्याचा प्रयत्न केला. विरोध होताच पवार यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने वाहनातून शिवापूर पोलिस चौकीकडे नेण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, पवार यांचे मित्र किरण आपटे हे सुमारे ७३ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून गेले.

Police
Pune 25 TMC Water Quota: पुण्यासाठी अतिरिक्त २५ टीएमसी पाण्याची मागणी; महापौरांची जलसंपदामंत्र्यांकडे धाव

तपासात समोर आली या दोन पोलिसांची नावे

सुरुवातीला विक्रम चाकणकर, अमेय, गणेश कदम आणि इतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुढील तपास आणि इतर आरोपींच्या चौकशीत पोलिस प्रमिला निकम आणि अजीजजब्बार मेस्त्री यांची नावे समोर आली. तपास यंत्रणेनुसार, या दोघांनी मुख्य आरोपींना संरक्षण दिले आणि संपूर्ण कटात त्यांची भूमिका असल्याचे प्राथमिक पुरावे समोर आले आहेत.

Police
E Search Registration Department: ई-सर्च सेवा आठवडाभर ठप्प; मालमत्तेच्या दस्त तपासणीत वकिलांची मोठी अडचण

आम्ही कसे निष्कलंक: आरोपींचा दावा

अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपी अधिकाऱ्यांनी, आम्हाला काळा पैसा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांना आम्ही शिवापूर पोलिस चौकीत आणले. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही; खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. निकम ह्या पुरस्कारप्राप्त महिला पोलिस आहेत. मेस्‍त्री यांचीही सेवाकारकीर्द निष्कलंक आहे. फिर्यादी काळा पैसा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याला चौकशीसाठी शिवापूर पोलिस ठाण्यात आणले. या घटनेत आम्ही एकही रुपया लुटलेला नाही किंवा दरोडा घातलेला नाही. संपूर्ण रक्कम फिर्यादीकडेच असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. आम्ही लोकसेवक असून, या प्रकरणामुळे प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. इतर अधिकाऱ्यांशी असलेल्या वादातून खोटे प्रकरण दाखल केले असून, तपासासाठी आमची कोठडी आवश्यक नसल्याने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला.

न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. आदेशात न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. इतर आरोपींच्या चौकशीत अर्जदारांची नावे समोर आली असून, त्यांनी मुख्य आरोपींना संरक्षण दिल्याचा आणि त्यांच्याबरोबर समान उद्देशाने काम केल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष दिसून येतो. त्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास कोणताही वाव नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारला असून, सरकारी पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news