

नारायणगाव: नारायणगाव एस.टी. बसस्थानकावर प्रवासासाठी आलेल्या ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र आणि मोबाईल असा एकूण ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करणाऱ्या ७१ वर्षीय आरोपीला नारायणगाव पोलिसांनी आळेफाटा बसस्थानकातून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सला सिताराम पवार (वय ६४, रा. बोडके नगर, जुन्नर) या ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास नारायणगाव एस.टी. बसस्थानकावर असताना चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र व मोबाईल चोरी केला होता.
या ऐवजाची एकूण किंमत ५ लाख २५ हजार रुपये होती. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी नारायणगाव पोलिसांना चोरीचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी तपास पथक तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो आळेफाटा बसस्थानक परिसरात आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव रमेश सुंदर भास्कर (वय ७१, रा. विठ्ठलवाडी अगर, ता. जुन्नर) असे सांगितले.
चौकशीदरम्यान त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला ताब्यात घेऊन नारायणगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अंगझडतीमध्ये फिर्यादी महिलेचे चोरीस गेलेले सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र व मोबाईल असा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला.