

पुणे: काश्मीरसह हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाल्याने त्या शीतलहरी महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत गारठा वाढला असून, गुरुवारी गोंदियाचा पारा १२.८ अंशांपर्यंत खाली आला होता. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, जळगावसह बहुतांश ठिकाणी दिवसभर थंडी जाणवत होती.
हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. त्यामुळे त्या भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याने उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्या शीतलहरी महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाल्याने आगामी दोन ते तीन दिवस थंडीचा कडाका राहणार आहे.
बंगालच्या उपसागरात १३ नोव्हेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते वायव्येकडे सरकून १४ ते १५ नोव्हेंबरच्या सुमारास तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. परिणामी, महाराष्ट्रावर शीत आणि दमट अशा दोन्ही वाऱ्यांची टक्कर होईल. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
गुरुवारचे राज्याचे किमान तापमान
गोंदिया १२.८, मुंबई २५, पुणे (शिवाजीनगर १४.६, एनडीए १२.६), जळगाव १३, कोल्हापूर १८.२, महाबळेश्वर १६.१, मालेगाव, नाशिक १३.९, सांगली १७.१, सातारा १४.४, सोलापूर १६.७, धाराशिव १७, छत्रपती संभाजीनगर १७.२, परभणी १७.५, नांदेड १५.९, अकोला १७.९, अमरावती १७.६, बुलडाणा १८, ब्रह्मपुरी १७.६, चंद्रपूर १८, गोंदिया १२.८, नागपूर १४.६, वाशिम १५.४, वर्धा १६.२, यवतमाळ १४.