

शिवाजी शिंदे
पुणे: टपाल विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाने यंदा जगातील सुमारे २०० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची किमया पार पाडली आहे. नागरिकांच्या मागणीवरून वेळेच्या आधी स्पीड पोस्ट आणि विमानसेवेच्या माध्यमातून सुरू केलेल्या दिवाळी फराळाने यंदा विक्रम केला असून, आतापर्यंत ३६ हजार किलो दिवाळी फराळ ३ हजार ६२३ पार्सलद्वारे पाठवण्यात आला आहे. अजून किमान एक हजार किलो फराळ पाठवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, गतवर्षीपेक्षा यावर्षी फराळ पाठवण्याच्या प्रक्रियेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच दिवसांत २ हजार ६०९ किलो फराळ १२५ देशांत पाठवण्यात आला होता. यंदा मात्र देशांच्या सख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे महसुलातही ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टपाल विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागामार्फत मागील काही वर्षांपासून परदेशात स्पीड पोस्ट आणि विमानसेवेच्या माध्यमातून दिवाळी फराळ पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे पुणे शहरासह टपालच्या पुणे प्रादेशिक विभागातील शहर (पूर्व, पश्चिम, एम.एफ.एल.), सोलापूर, सातारा, बारामती, पंढरपूर, कराड, श्रीरामपूर, अहिल्यानगर या दहा विभागांतून हळूहळू परदेशात दिवाळी पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला युरोपियन देशापासून सुरू झालेला प्रवास आता मात्र जगातील २०० देशात टपाल विभागाकडून पार्सलद्वारे दिवाळी फराळ अगदी माफत दरात पाठवण्यात येत आहे.
दिवाळी फराळ परदेशात पाठविण्यासाठी टपाल विभागाने पाठवण्यासाठी स्वतंत्र पार्सल यंत्रणा उभारली आहे. पार्सल पँकिग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील पार्सल पँकिग करण्याचे खास प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे कितीही किलोचे पार्सल असले तरी काही मिनिटांतच ते पँकिग करता येते.
यंदाच्या दिवाळीच्या सीझनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक २० किलो फराळाचे पार्सल पाठवण्यात आले आहे. हे पार्सल ऑस्ट्रोलिया देशात पाठवण्यात आले असल्याचे टपाल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दिवाळीच्य फराळाबरोबरच दिवाळी अंक, परदेशात स्थायिक असलेल्या मित्र आणि नातेवाइकांनी पुस्तकांची मागणी त्यांच्या नातेवाइकांकडे केली होती, ती पुस्तके देखील यावर्षी पाठवण्यात आलेली आहेत.