पुणे शहरात पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी दाेन तरुणांचे खून
पुण्यातील हडपसर व दत्तवाडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. पहाटेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. एका रिक्षाचालकासह दोघा जणांवर वार करुन त्यांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोघा तरुणांचे खून झाल्याच्या घटनेने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हडपसर येथील सोलापूर रोडवरील पंधरा नंबर चौकात एका रिक्षाचालकाच्या गळ्यावर वार करुन खून करण्यात आला आहे. प्रदीप शिवाजी गवळी (वय २५) असे त्याचे नाव आहे. सोलापूर रोडवरील १५ नंबर चौकात एकाचा मृतदेह असल्याची माहिती एका नागरिकाने पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. प्रदीप गवळी यांच्या गळ्यावर वार करुन त्यांचा खून केल्याचे आढळून आले. मात्र खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
दारु पिण्यावरुन भांडण, चाकूने वार करुन तरुणाचा खून
दुसरी घटना सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिराजवळील सई हेरिटेजसमोर पहाटे घडली. एका तरुणावर चाकूने वार करुन त्याचा खून करण्यात आला. मंदार जोगदंड (वय २३, रा. दांडेकर पुल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंदार व तिघा मध्ये दारु पिण्यावरुन भांडण झाले. त्यात त्यांनी मंदारवर चाकूने वार करुन त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

