सातारा : पत्नीशी भांडणातून स्वतःचे घर जाळताना दहा घरे जळून खाक | पुढारी

सातारा : पत्नीशी भांडणातून स्वतःचे घर जाळताना दहा घरे जळून खाक

चाफळ : पुढारी वृत्तसेवा

माजगाव (ता. पाटण)  येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वत:चे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

येथील संजय रामचंद्र पाटील व त्याची पत्नी पालवी यांचे घरगुती भांडण दिवसभर सुरू होते. या भांडणातून संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घराला आग लावली. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भीमराव गणपती पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील यांच्या दहा घरांना भीषण आग लागली.

या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीत पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री साखर कारखाना, जयवंत शुगरच्या अग्निशामक पथकाला पाचारण केले.

अग्निशामक दलाचे जवान आणि ग्रामस्थांच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, दागिने, रोकड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

माजगाव ग्रामपंचायतीने नळास पाणी सोडले. तरुणांनी व शेजारील लोकांनीही मिळेल त्या भांड्याने पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील , मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे स.पो.नि. उत्तम भापकर, चाफळ पोलिस दूर क्षेत्राचे सिद्धांत शेडगे, होमगार्ड यांनी घटनास्थळी धाव येऊन सर्वतोपरी मदत केली.

Back to top button