आंतरराष्ट्रीय जगतात आधी विकिलिक्स प्रकरण येऊन गेले. नंतर पनामा पेपर्स आले. पँडोरा पेपर्स आता गाजत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सोमय्या टेप एक दिवस वाजली आणि पुन्हा आवाजही नाही, असे काहीसे घडले. शिवसेनेचे उपनेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात माहितीची रसद सेनेचे नेते रामदास कदम यांनीच पुरवली. याचे पुरावे देणारे संभाषण एका टेपमध्ये महाराष्ट्राने ऐकले. कदम म्हणाले, 'हा माझा आवाज नाही.' अशा खुलाशांवर कुणी विश्वास ठेवत नाही. आवाज लोक ओळखतात आणि त्या आवाजात कोण कुणाला काय सांगत होते, हेदेखील लोकांना समजते. शिवसेनेच्या नेतृत्वाला ते कितपत कळले, हे बहुधा दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसलेच. कोरोनाचे निर्बंध असल्याने हा मेळावा बंदिस्त सभागृहात झाला. उपस्थितीला 50 टक्के मर्यादा असल्याने सभागृहात आणि व्यासपीठावरील खुर्च्यांची संख्याही निम्म्यावर आली. त्यामुळेच रामदास कदम, थेट शरद पवारांवर हल्ला चढवणारे अनंत गिते या नेत्यांसाठीच्या खुर्च्या बाजूला ठेवणे तसे सहज शक्य झाले. मेळाव्याचे निमंत्रण या दोघांना दिले नाही, असाही निरोप राज्यभरात पोहोचला. प्रश्न अगदीच कदम किंवा गीते यांचा नाही. असे अनेक कदम, गीते शिवसेनेमध्ये दिसतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देत मुख्यमंत्रिपदासह मर्यादित सत्तेत आल्यापासून सेनेमध्ये अनेक चुलीवरच्या भाकरी फिरवलेल्या दिसतात. ज्याची कच्ची तो नाराज, भाजली जाते तो खूश असणे साहजिक म्हणायचे.
एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्यासह महत्त्वाची खाती सांभाळत असले, तरी आता 'मातोश्री'च्या मर्जीत राहिलेले नाहीत. शिंदे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी अनिल परब यांचे महत्त्व वाढवले गेले; पण परब काही शिंदे होऊ शकत नाहीत. शिंदे यांनी शिवसेनेमध्ये स्थान निर्माण केले ते आपल्या मजबूत कामांमुळे. शेतकरी मोर्चे असोत, आदिवासी मोर्चे असोत किंवा जलप्रलय, प्रत्येक ठिकाणी पदरमोड करून शिंदे सर्वप्रथम पोहोचत आले आहेत. त्यांना मानणारा एक मोठा गट सेनेत निर्माण झाला. त्याचे भान आज शिवसेनेच्या धुरंधरांना ठेवावे लागते. त्यामुळे शिंदे यांना अगदीच दूर लोटता येत नाही आणि खूप जवळही ठेवता येत नाही, अशी 'मातोश्री'ची स्थिती झालेली दिसते. खरे तर, महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन होत असताना मुख्यमंत्रिपदाचा सूट तयार ठेवा, असा निरोप 'मातोश्री'ने शिंदे यांनाच दिला होता. मात्र, नंतर सारेच राजकारण फिरले आणि स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
सेनेतील क्रमांक दोनचे मंत्री म्हणून शिंदे ओळखले जातात, तरीही 'ऑल इज नॉट वेल', अशी स्थिती आहे. कुणाला सांगूनही विश्वास बसणार नाही; पण सेनेतील नाराज नेत्यांमध्ये संजय राऊत यांचीही गणना होते. तेही पूर्वीइतके 'मातोश्री'च्या जवळ नाहीत. मुख्यमंत्रिपद थोडक्यात हुकले तेव्हापासून त्यांचे मन त्यांना सारखे खाते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून संजय राऊत यांचेच नाव घेतले जात होते. राऊत मुख्यमंत्री झाले, तर मुख्यमंत्रिपद सेनेला दिले काय किंवा राष्ट्रवादीकडे आले काय फारसा फरक पडणार नाही, अशी पवारनीती होती. मात्र, अचानक आदित्य ठाकरेंनी फोन करून सांगितले, काका, तुम्ही थांबा आणि राऊत यांना थांबावे लागले! तेव्हापासून शिवसेनेची खिंड लढवत असल्याचा आभास निर्माण करत असले तरी राऊत मनातून कमालीचे खिन्न जाणवतात. अर्थात, रामदास कदम यांची जशी टेप बाहेर आली अशी काही टेप राऊत यांची येणार नाही. 'इशारतीचे बोलो नये। बोलायचे ते लिहू नये। लिहायचे ते सांगू नये। जबानीने॥' जे इशार्याने सांगायचे ते जबानीच्या टेपमध्ये येऊ द्यायचे नसते, इतके त्यांना नीट कळते.
सोमय्या टेपमुळे एका वेगळ्या राजकीय समीकरणाच्या दिशेने महाराष्ट्र जातो की राजकीय कणा ताठ ठेवून मजबुतीने राजकारण खेळतो, हे येत्या काळात दिसेल. सोमय्यांनी एकाच वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना टार्गेट केले आहे. या दोघांपैकी एका पक्षाची विकेट काढल्याशिवाय महाराष्ट्राच्या सत्तेचे मैदान भाजपला खुले होणार नाही. सोमय्यांनी आर्थिक भानगडींचे आरोप करायचे आणि पाठोपाठ ईडीने धाडी टाकायच्या, असे एक सूत्रबद्ध समीकरणच आता तयार झाले आहे. सोमय्यांच्या या मोहिमेत प्रयोगशीलता आहे, तोचतोपणा नाही. ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्या मालमत्तांना भेट द्यायची, तिथे सेल्फी काढायचा असा नवा फंडा सोमय्यांनी सुरू केला. मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यासमोर त्यांनी सेल्फी काढला. नार्वेकरांना बंगला पाडावा लागला. अनिल परब यांच्या रिसॉर्टसमोरही सोमय्यांनी सेल्फी काढला आणि हे रिसॉर्टही आता पाडावे लागणार. हे असेच सुरू राहिले तर सोमय्यांचे फॅनदेखील त्यांच्या बाजूला येऊन सेल्फी काढणे बंद करतील. मात्र, राजकारणात या सेल्फीकडे वेगळ्या नजरेने पाहावे लागते. सोमय्यांनी सेल्फी काढला की तो विरोधक भारतीय जनता पक्षात आज ना उद्या दाखल होणार असतो. स्वत: सोमय्या यांनीच हे दाखले निर्माण केले आणि बहुपेडी नेतृत्वांना भाजपच्या झेंड्याखाली आणले. त्यातून एवं गुणवैशिष्ट्य असलेल्या नेतृत्वांनी प्रदेश भाजपमध्ये नाही म्हटले तरी समृद्धता आणली.
कृपाशंकर सिंह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्याविरोधात सोमय्याच ईडीपर्यंत गेले. उशिरा का होईना कृपाशंकर भाजपमध्ये आले आणि आज ते मुंबई भाजपचे उपाध्यक्षदेखील आहेत. बबनराव पाचपुतेंच्या पाँझी स्कीम्सची लक्तरे वेशीवर टांगणारे सोमय्याच होते. ते पाचपुतेही भाजपच्या झेंड्याखाली दाखल झाले आहेत. विजयकुमार गावित हेदेखील असेच एक उदाहरण.
आदिवासी विकास खात्यात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध सोमय्या रोज तोफगोळे उडवत होते. तेच गावित 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची मुलगीही खासदार झाली. आज केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांच्याही मागे सोमय्या 2017 मध्येच लागले होते. 300 कोटींच्या मनी लाँडरिंगचा आरोप तेव्हा सोमय्यांनी केला. राणेदेखील अंमळ उशिरा का होईना; पण आधी स्वाभिमान पक्ष स्थापन करीत मग हा स्वाभिमान पक्ष विलीन करीत भाजपमध्ये आले आणि आज केंद्रीय मंत्री झाले.
ही सारी उदाहरणे अत्यंत ताजी आणि प्रातिनिधिक आहेत. आज सोमय्या यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध आघाडी उघडलेली दिसते. त्यात हसन मुश्रीफ आहेत, अनिल परब आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, महापौर किशोरी पेडणेकर आहेत, खा. भावना गवळी आहेत, प्रताप सरनाईक आहेत. यातील कोण कोण सोमय्यांच्या गळाला लागते, ते आता बघायचे. गळाला लागेल ते नेतृत्व एखाद्या वॉशिंग मशिनमधून काढल्यासारखे स्वच्छ धुवायचे आणि भाजपच्या दोरीवर वाळत टाकायचे अशी कल्पना एका व्यंगचित्रकाराने मध्यंतरी रंगवली. ती खरी मानावी लागते. अनेक रथी-महारथी सोमय्यांच्या मोहिमेत आधी बदनाम झाले आणि नंतर शुुुचिर्भूत होऊन भाजपमध्ये गुमान दाखल झाले. भाजपमध्ये असे काय आहे, याचे उत्तर हर्षवर्धन पाटील यांनी आता दिले. ते म्हणाले, 'भाजपमध्ये गेल्यापासून शांत आहे, निवांत आहे. रोज रात्री शांत झोप लागते. काही चौकशी नाही, काही नाही…' असे सुख कुणाला नको आहे? अशी शांत झोप आज तरी फक्त सोमय्याच देऊ शकतात.