

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : आंदरमावळ भागातील माळेगाव बु गावच्या हद्दीतील तळपेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या आदिवासी महिलेच्या खूनाचा अवघ्या दोन दिवसात छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून खूनप्रकरणी मृत महिलेच्या चुलत भावाला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान आरोपीने जमिनीच्या वादातून हा खून केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली.पत्रकार परिषदेस उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले उपस्थित होते.
वसंत रघु माळी(वय २८) असे आरोपीचे नाव असून आरोपी हा मृत महिलेचा चुलत भाऊ आहे. रविवारी दुपारी तळपेवाडी येथे आरोपी माळी याने त्याची चुलत बहीण फसाबाई साळू निसाळ यांचा कोयत्याने तोंडावर, मानेवर, हातावर सुमारे ३५ वार करून निर्घृण खून केला होता.
अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मृत महिलेचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला असल्याने व कुठलाही पुरावा घटनास्थळी नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव पोलीस अशी दोन पथके तैनात केली होती.
मृत महिलेचा कोणाशी वाद वैगरे आहे का याबाबत माहिती घेतली असता, चुलत भावाशी जमिनीवरून वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी माळी याच्या संशयास्पद हालचाली दिसत होत्या.
त्यानुसार आरोपी माळी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच हा खून केली असल्याची कबुली दिली. दरम्यान मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत मिळाला असला तरी अन्य कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे घट्टे यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय वडोदे, संतोष चामे, रामेश्वर धोंगडे, अमोल गोरे, प्रकाश वाघमारे, प्रमोद नवले, सुनील जावळे, श्रीशैल कंटोळी, सचिन काळे, अमोल कसबेकर, मनोज कदम, संजय सुपे, अमोल तावरे, शशिकांत खोपडे, भाऊसाहेब खाडे, संतोष वाडेकर, प्राण येवले, होमगार्ड सुरेश शिंदे, नवनाथ चिमटे यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, आरोपी माळी याने चुलत बहिणीचा खून करून तेथील प्लास्टिक ड्रममधील पाण्याने हात धुतले व २ ते अडीच किलोमीटर अंतरावर जंगलात निघून गेला.
त्याठिकाणी अंगावरील रक्ताने माखलेले शर्ट ओढ्याच्या पाण्याने अर्धवट धूवून गुन्ह्यात वापरलेला कोयता ओढ्याजवळ दगडामध्ये लपवून ठेवून पुन्हा घरी निघून गेला. त्यानंतर तो तपास सुरू असताना गावातच खुलेआम फिरत होता.
आरोपी व मृत महिला यांची सुमारे ९ एकर सामाईक जमीन असून या जमिनीवरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच त्याने पती-पत्नी या दोघांना संपविण्याचा कट केला होता.
त्यानुसार तो गोठ्यावर दबा धरून बसला होता, परंतु, त्याठिकाणी गुरांना पाणी पाजण्यासाठी फक्त मृत महिला एकटीच आली व त्याने तिला ठार मारले. सुदैवाने पती साळू निसाळ हे शेतातच काम करत बसले व गोठ्यावर आले नाही म्हणून बचावले.