बीड : मुलगा, सून ऊसतोडीवर, घरात आढळला ८ दिवस सडलेला वृद्धाचा मृतदेह | पुढारी

बीड : मुलगा, सून ऊसतोडीवर, घरात आढळला ८ दिवस सडलेला वृद्धाचा मृतदेह

धारूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आसोला येथे मारोती सिरसट (वय ६२) या वृध्दाचा घराच्या मागील बाजुस सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आसोला येथील मारोती सिरसट यांचा मुलगा व सून ऊस तोडणीसाठी कारखान्याकडे गेले आहेत. त्यामुळे ते घरी एकटेच राहतात. दरम्यान, रेपेवाडी येथील त्यांच्या मुलीने त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. तर त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे मुलीचे पती घरी आले असता त्यांना घरामागील बाजाखाली मारोती यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पालथा पडल्याचे आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली.

त्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गुंड दाखल झाले. मृतदेह सडलेला असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आदमाने, डॉ. कृष्णा पवार यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन केले. हा मृत्यू होऊन आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संजय गुंड करत आहेत.

“ऊस मजुरांची ऊस तोडणीला जाण्याची दैना कधी संपेल ?”

ऊस तोडणीसाठी परराज्यात गेलेल्या मुलाला आपल्या वडिलाचे शेवटचे दर्शनही झाले नाही. ही घटना खूपच दुःखदायक आहे. कारण घर चालविण्यासाठी घरदार सोडून परराज्यात ऊसतोडणीसाठी जावे लागते. व गावाकडे वयोवृद्ध आईवडील, लहान बालकांना ठेवावे लागते. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसते. ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : भारतात स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज : डॉ. निहारिका प्रभू |

Back to top button