

पुणे : आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने 'हिमनदी संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यावरच आधारित "पर्वतरांगांमध्ये पाणी, अन्न आणि उपजीविके साठीचे हिमनद्यांचे महत्व" ही थीम घोषित करण्यात आली आहे. गिरिप्रेमी तर्फे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीच्या थीमला अनुसरून पर्वतरक्षण, हिमनदी संवर्धन आणि पर्यावरण जागरूकतेवर आधारित दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रोझन लाइफलाईन्स (Frozen Lifelines) या विषयावर आधारित परिसंवाद व प्रदर्शनाद्वारे समाजात जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. वितळणाऱ्या हिमनद्या: आपल्या पिढीसाठी एक जागरुकतेची सूचना या विषयावर दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता ऑडिटोरियम, भांडारकर इन्स्टिट्यूट, लॉ कॉलेज रोड येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व भूशास्त्रज्ञ प्रा. डॉ. नितिन करमळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हिमनदीशास्त्रमधील पीएचडी विद्यार्थी कृष्णानंद हे प्रमुख वक्ते, तर गिर्यारोहक डॉ. अविनाश कांदेकर व कूल द ग्लोब ॲपच्या संस्थापक प्राची शेवगावकर हे अतिथी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर फ्रोजन लाईफलाईन्स या विषयावर दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १३ आणि १४ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं. ८.०० या वेळेत टाटा हॉल, भांडारकर इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनसाठी पुर्णार्थ संस्थेचे राहुल राठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, कर्नल योगेश धुमाळ (निवृत्त) हे विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. उमेश झिरपे यांनी यावेळी दिली.