Land Scam Investigation: मुंढवा जमीन घोटाळा गाजतोय! शीतल तेजवाणींचा पोलिसांपुढे जबाब नोंद; तपासात नवे धागेदोरे
पुणेः मुंढव्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणी यांचा पोलिसांनी मंगळवारी (दि.18) जबाब नोंद करून घेतला. याप्रकरणी तेजवाणी यांच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, तत्पूर्वी ही जमीन लिहून (पॉवर ऑफ अॅटर्नी) देणाऱ्या संबंधित व्यक्तींना देखील पोलिसांनी चौकशीला बोलाविले होते.
मात्र, त्यातील काही व्यक्ती या सोमवारी पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहिल्या. परंतु, त्यांनी आम्ही जबाबनंतर नोंदवू अशी भूमिका घेतली. एकूण २७५ व्यक्ती या जमीनप्रकरणात असून, त्या सर्वांकडे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अमेडिया कंपनीचे संचालक मेसर्स दिग्विजय पाटील यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे.
याबाबत बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, मंगळवारी शीतल तेजवाणी या जबाब नोंदविण्यास आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाल्या. त्यांचा जबाब नोंदविला असून, त्याचे अवलोकन सुरू आहे. इतर दस्तऐवजांची पडताळणी सुरू आहे. या सर्व तपासानंतर पुढील कारवाई संदर्भाने निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास शीतल तेजवाणी यांना चौकशीला पुन्हा बोलविण्यात येईल. तसेच, दिग्विजय पाटील यांना नोटीस देण्यात आली असून, ते अद्याप हजर राहिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंढवा जमीनप्रकरणात २७५ व्यक्ती
मुंढवा जमीनप्रकरणात २७५ व्यक्ती आहेत. ही जमीन पॉवर ऑफ अॅटर्नी करून शीतल तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी लिहून दिली. त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. त्यानुसार, शीतल तेजवाणी यांना या जमिनीबाबत नेमके काय लिहून दिले, या व्यक्तींना काही मोबदला दिला गेला किंवा मिळाला आहे का तसेच, नेमके या व्यक्तींनी जमीनबाबत त्यांना हक्क कसा दिला, याचा तपास सुरू केला आहे. त्यानुसार, संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार, सोमवारी दहा ते बारा व्यक्ती हजर राहिल्या. त्यांनी आम्ही जबाब नंतर देऊ, अशी भूमिका घेतली.

