

नारायणगाव: जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्याचे भाजपचे नेते सांगत असले तरी नगराध्यक्षपदासाठी दोन्हीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला असून, सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. खरे चित्र उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.
शिवसेना-भाजप युती होणार की स्वतंत्र लढणार, याबाबत मात्र सध्या स्थानिक नेते काही बोलत नाहीत. एकत्रित निवडणूक लढवायचे ठरले असतानाही व नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला गेली असताना भाजपने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल का केला?
असा आक्षेप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेला दिली असून, या महिला उमेदवारांच्या पतीने एका प्रभागात अर्ज दाखल का केला? असा भाजपचा आक्षेप आहे. त्या मुद्द्यावरून काही प्रमाणात मतभेद निर्माण झाले आहेत.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे एकत्र आले असले तरी आहेत. या आघाडीकडून कांचन सुनील मेहेर यांना नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या, परंतु त्यांना शिवसेनेने एबी फॉर्म न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सेनेला देखील गटबाजीचे ग्रहण लागले आहे. काँग्रेसने मात्र महाविकास आघाडी सोबत न जाता 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. नगराध्यक्षपदासह अवघे सात उमेदवार रिंगणात उभे केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा काही कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे नाराज मंडळींनी इतर पक्षांचा आसरा घेतला आहे. बाळा सदाकाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते; परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.