

सुभाष पाटील
Kolhapur Shahuwadi Omkar Bhosale MPSC success
विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील निळे (बानेकर वाडी) येथील ओंकार भिकाजी भोसले याने अपघातानंतरही हार न मानता, व्हीलचेअरवर बसून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट क (क्लार्क) परीक्षेत यश मिळवले आहे. ओंकारच्या जिद्दीची आणि मेहनतीची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
१० जुलै २०१२ रोजी जांभळाच्या झाडावरून पडल्याने ओंकारच्या पायाला गंभीर दुखापत झाली. १५ जुलैला ऑपरेशन झाले, पण त्यानंतर व्हीलचेअर हेच त्याचे आयुष्य बनले. या अपघाताने आयुष्याची दिशा बदलली, पण ओंकारने स्वप्नांचा पाठपुरावा थांबवला नाही.
ओंकारच्या यशामागे त्याचे आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ आहे. आई पोलीस असल्याने काही काळ बावडा येथे पोलीस लाईनमध्ये, तर काही काळ गावी राहून त्याने अभ्यास केला. भावाने खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले. शाश्वत ॲकॅडमीच्या Fastrack बॅचमध्ये आणि प्रभात करियर अकॅडमी, मलकापूरचे संचालक विनोद भोसले यांचे मार्गदर्शनही त्याला मिळाले.
ओंकारने तीन वर्षे सातत्याने अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, पण खचून न जाता २०२२ डिसेंबरमध्ये पूर्व परीक्षा, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी मेन्स परीक्षा दिली. अखेर ११ जुलै २०२५ रोजी निकाल लागला आणि त्याच्या यशावर शिक्कामोर्तब झाले.
ओंकार हा उत्तम स्विमिंगपटूही आहे. स्पोर्ट्समध्ये सातत्य राखत त्याने अभ्यासातही लक्ष दिले. अपघातानंतर आलेल्या अडचणींवर मात करत, मनाची तयारी करून आणि कुटुंबाच्या आधारावर त्याने हे यश मिळवले.