

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार करणार्या उमेदवारांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. आता परीक्षेत गैरप्रकार करणार्यांवर चांगला चाप बसणार आहे. यामुळे अशा उमेदवारांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे दरवाजे कायमचे बंद होणार आहेत.
एमपीएससीने 2011 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत गैरप्रकार करणार्या 90 उमेदवारांना कायमस्वरूपी परीक्षा देण्यास प्रतिबंधित केले असून, त्यांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. या उमेदवारांना भविष्यात एमपीएसीची कोणतीही परीक्षा देता येणार नाही. तसेच चौघांना पाच वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. सदोष कागदपत्रे सादर करणे, परीक्षेदरम्यान गैरवर्तन करणे अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
या काळ्या यादीमध्ये सर्वाधिक 20 उमेदवार हे 2016 च्या कर सहायक परीक्षेतील आहेत. याव्यतिरिक्त पोलिस उपनिरीक्षक, राज्यसेवा पूर्व परीक्षा, लिपिक, टंकलेखक आदी परीक्षांमधील उमेदवारांचाही समावेश आहे. आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षांच्या पारदर्शकतेवर विश्वास वाढला आहे.
अशी होते कारवाई
एमपीएससीकडून परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असते आणि उमेदवारांची कसून तपासणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा गैरवापर करणार्या उमेदवारांवर आयोगाची करडी नजर असते. दोषी आढळल्यास त्यांची चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी परीक्षेची बंदी घातली जाते. अशा उमेदवारांची नावे सार्वजनिक केली जातात.