

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपालांच्या आदेशानुसार राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील तसेच महेंद्र वारभुवन यांची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीमध्ये आता ‘नवा गडी नवे राज्य’ सुरू होणार असल्याचे चित्र आहे. (Latest Pune News)
या नव्या नियुक्तींमध्ये राजीव निवतकर, डॉ. दिलीप भुजबळ-पाटील आणि महेंद्र वारभुवन यांचा समावेश आहे. या तिन्ही नामवंत व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन आदेशानुसार, सदर नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. संबंधित आदेश शासनाचे सहसचिव गीता कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यसेवेची निवड प्रक्रिया पारदर्शक व कार्यक्षम व्हावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एक महत्त्वाचा घटक असून, नव्या सदस्यांच्या अनुभवाचा फायदा या प्रक्रियेत होईल, अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे. नव्या सदस्यांच्या नियुक्तीनंतर आयोगाच्या कार्यक्षमतेत अधिक भर पडेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेला चालना मिळेल.
ही नियुक्ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीसाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. नवीन सदस्यांच्या नेमणुकीमुळे भरतीसाठीची जाहिरात, परीक्षा आणि निकाल, यासाठी लागणार्या वेळेला गती मिळण्याची शक्यता स्पर्धा परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे.