

MPSC Exam Timetable 2026
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2026 सालासाठीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही 29 मार्च ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार असून, या परीक्षेचा निकाल जुलै 2026 पर्यंत लागण्याची शक्यता आहे.
वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025 या सर्व परीक्षा मे 2026 मध्ये होणार आहेत. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 5 ते 9 मे दरम्यान, तर स्थापत्य अभियांत्रिकी व कृषी सेवा मुख्य परीक्षा 16 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. कृषी सेवांचा निकाल ऑगस्ट 2026 मध्ये घोषित होण्याची शक्यता आहे.
गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 ही 17 मे 2026 रोजी होणार असून निकाल सप्टेंबर 2026 मध्ये अपेक्षित आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 4 जानेवारी 2026 रोजी घेतली जाईल, तर तिचा निकाल मार्च 2026 मध्ये जाहीर होईल. या परीक्षेची मुख्य परीक्षा 7 जून 2026 रोजी नियोजित आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 35 संवर्गांसाठी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची जाहिरात डिसेंबर 2025 पर्यंत प्रसिद्ध होईल, आणि परीक्षा 31 मे 2026 रोजी होणार आहे. या माध्यमातून गट अ व गट ब संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत.या वेळापत्रकाबाबत आयोगाने स्पष्ट केले आहे की, शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.
शासनाकडून विहितवेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदेविज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. तसेच, हे वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.
3 ते 24 ऑक्टोबर 2026ला होणार पुढील वर्षाची परीक्षा
गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 14 जून 2026, आणि तिची मुख्य परीक्षा 5 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 12 जुलै 2026 रोजी होणार असून, तिची मुख्य परीक्षा 13 डिसेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 35 संवर्गांसाठी घेण्यात येणार आहे.