पिंपरी : मोका पॅटर्नमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ

पिंपरी : मोका पॅटर्नमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मोका पॅटर्नमुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मागील सहा महिन्यांत तब्बल 21 टोळ्यांतील 209 अट्टल गुन्हेगारांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी ऑगस्ट 2018 मध्ये स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. दरम्यान, पोलिसांचा वावर वाढल्याने शहर परिसरात अ‍ॅक्टिव्ह असलेल्या नामचीन टोळ्या भूमिगत झाल्या. मात्र, तरीही शहरात उदयास आलेल्या नवीन गुंडांनी शहर अशांत ठेवले.

गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या. अल्पवयीन गुन्हेगारांचे समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शरीर आणि मालाविरुध्दचे दोनपेक्षा जास्त गुन्हे असणार्‍यांची कुंडली काढण्यात आली. दरम्यान, समाजात दहशत पसरविणार्‍या टोळ्यांची मुस्कटदाबी करण्याचे सक्तीचे आदेश चौबे यांनी दिले.

209 आरोपींवर मोकानुसार कारवाई

मागील सहा महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील 21 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 209 आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाल्याचे पाहण्यास मिळत आहे. पोलिसांनी आणखी काही सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळातही मोकाचा ठोका सुरूच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

अमर चौहाण टोळीवर मोका

  • पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात गंभीर गुन्हे नावावर असणार्‍या सराईत गुन्हेगार अमर चौहाण टोळीवरदेखील (मोका) कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख अमर ऊर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण (33, रा. पिंपरी), रोहित प्रवीण धनवे (20, रा. पिंपरी), अक्षय अण्णा रणदिवे (29, रा. भोसरी), साहिल सुधीर धनवे (20, रा. पिंपरी), सोन्या रणदिवे (रा. पिंपरी) अशी कारवाई झालेल्या आरोपींची
    नावे आहेत.
  • या टोळीवर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पिंपरी, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, चिंचवड, तर पुणे आयुक्तालयातील बंडगार्डन, येरवडा, विश्रांतवाडी, समर्थनगर, सहकारनगर, विमानतळ, चंदननगर पोलिस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, कट करणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण करणे, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगणे, असे 38 गुन्हे नोंद आहेत.

शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तडीपारी, स्थानबद्ध आणि मोकासारख्या प्रभावी कारवाया करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात याचे चांगले परिणाम दिसतील.

– विनयकुमार चौबे,
पोलिस आयुक्त,
पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news