पिंपरी : डांगे चौकात लूटमार करणार्‍या चौघांना अटक | पुढारी

पिंपरी : डांगे चौकात लूटमार करणार्‍या चौघांना अटक

पिंपरी(पुणे); पुढारी वृतसेवा : पादचार्‍याला मारहाण करीत लुटणार्‍या चौघांना गुन्हे शाखा युनिट चार आणि दरोडा विरोधी पथकाने अटक केली. आरोपींनी 23 जुलै रोजी डांगे चौक येथे एकाला लुटले होते. अजय शंकर शर्मा (19, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, अन्य तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सौरभ संतोष आरगळे (रा. रुपीनगर, निगडी), मुकेश गुप्ता (रा. बिजलीनगर, चिंचवड) हे अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी एक मजूर डांगे चौकातून पायी चालत जात असताना त्याला रस्त्यात अडवून मारहाण करीत लुटले. मजुराकडील दहा हजार रुपये चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट चार आणि दरोडा विरोधी पथक यांची दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही पथकांनी डांगे चौक परिसरातील सुमारे 70 सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढला. आरोपींकडून चोरी केलेले तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उपयोग झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांनी केली कारवाई

गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

जागतिक हिपॅटायटीस दिन : हिपॅटायटीस आजाराविषयी जागरूकतेचा अभाव

तिसगावमध्ये सरकारी जागेत बसून मावाविक्री

पुणे : पन्नास हजार वीज ग्राहक अंधारात

Back to top button