

निवडणूक... कालची, आजची
सुनील माळी
अन् आली मोदी लाट
आकाश मोकळे, निळेभोर असते अन् अचानक वावटळ येते, काळे ढग भरून येतात, मुसळधार पावसाने रस्त्यातल्या सर्व वस्तू वाहून जातात. तसेच काहीसे देशाच्या राजकीय पटलावर झाले २०१४ मध्ये. दिल्लीत सुरू झालेला झंझावात राज्यामध्ये आणि अगदी पुणे महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत पोहचला. या झंझावाताचे नाव होते नरेंद्र मोदी... (Latest Pune News)
देशाच्या राजकीय स्थितीला एकदम वेगळे वळण मिळाले ते ने वर्ष होते २०१४. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दिल्ली आणि मुंबईची सत्ता २०१४ या एकाच वर्षी जिंकली. हा विजय इतका जबरदस्त होता, की त्याचे परिणाम अगदी तळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत झाले. पुणे महापालिकेपुरते बोलायचे, तर पुणे महापालिकेची २०१७ मध्ये झालेली निवडणूक पुण्याच्या दृष्टीने अभूतपूर्व अशीच ठरली. भारतीय जनता पक्षाचे तब्बल ९९ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. भाजपने प्रथमच पुण्यातली सत्ता हस्तगत केली. विरोधकांपासून ते निकालाचे अंदाज बांधणाऱ्या राजकीय विश्लेषकांपर्यंतच्या सर्वांनी तोंडात बोटे घालावी असे ते निकाल होते.
पुणे महापालिकेच्या इतिहासात सुरुवातीला नागरी संघटना-महाराष्ट्र एकीकरण समिती आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे खंबीरपणाने उभे राहणाऱ्या पुणेकरांनी प्रथमच भाजपला बहुमत देणे पसंत केले. तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाचे आणि काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभावाचे काही मोजके अपवाद वगळले तर इतर सर्वच भागांत भाजपने मुसंडी मारली. 'अमुक झोपडपट्टी ही काँग्रेसची परंपरागत', 'अमुक अल्पसंख्याकांचा भाग भाजपला कायम विरोधच करणार' असे राजकीय पंडितांचे ठोकताळे साफ चुकले. मोदी यांच्या मागे प्रामुख्याने तरुण आणि मध्यमवर्ग गेला. परिणामी, 'काँग्रेसचा बालेकिल्ला' असे वर्णन करण्यात येणारे वॉर्ड-प्रभाग कोसळले. निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी केलेले 'भाजप शंभर जागा जिंकणार' हे भाकीत धमाल उडवून गेले. ते सुरुवातीला पुणेकरांच्या टिंगलीचा विषय झाले होते. विरोधक आणि पुणेकर तर सोडाच; पण तेव्हाचे पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेतेही खासगीत बोलताना शंभर जागांच्या अंदाजाची (आणि अंदाज करणाऱ्यांची) टर उडवत होते. 'शंभर येणार नाहीत आमच्या; पण चांगल्या जागा येतील,' अशी त्यांची सावध प्रतिक्रिया होती.
यानिमित्त भाजपची पुणे महापालिकेतील आत्तापर्यंतची राजकीय वाटचाल कशी होती, ते पाहणे रंजक ठरेल. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली असली, तरी त्या पक्षाचे आधीचे रूप होते जनसंघाचे. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत या पक्षाला लक्षणीय जागा मिळाल्या नसल्या, तरी त्याचे पहिल्यांदा अस्तित्व जाणवले ते १९६८ च्या निवडणुकीत. त्या निवडणुकीत जनसंघाचे एकदम १६ सदस्य निवडून आले. त्याचे कारण होते, नव्याने लागू झालेली एकसदस्यीय पद्धत. महापालिकेच्या १९५२, १९५७ आणि १९६२ या निवडणुका पॅनेल पद्धतीने लढविल्या गेल्या आणि साहजिकच मोठ्या पक्षांना त्याचा फायदा झाला. त्यानंतर प्रथमच १९६८ मध्ये एकसदस्यीय पद्धत लागू करण्यात आली आणि जनसंघाचे हुकमी मतदार असलेल्या वॉर्डामध्ये त्या पक्षाला यश मिळाले. भाजपच्या स्थापनेनंतरच्या निवडणुकांत त्या पक्षाला माफक जागाच मिळत गेल्या. शिवसेनेशी युती केल्यानंतर पक्षाची स्थिती सुधारली.
त्यामुळे १९९२ मध्ये १११ जागांपैकी ९० जागी उमेदवार उभे होते, त्यापैकी २४ जण निवडून आले; म्हणजेच एकूण जागांच्या २६ टक्के, तर एकूण मतांच्या १५ टक्के मते त्या पक्षाला मिळाली. या पक्षाची कामगिरी पुढच्या म्हणजे १९९७ च्या निवडणुकीत थोडी घसरली. पक्षाने १२४ जागांपैकी ६७ जागा लढविल्या आणि आधीच्या तुलनेत चार जागांची हानी होत २० जण निवडून आले. मतांची टक्केवारीही थोडी कमी होऊन १३.६४ झाली. काँग्रेसच्या फुटीनंतर २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, भाजपच्या जागा वाढल्या. एकूण १४६ पैकी त्या पक्षाने ७९ जागा लढविल्या आणि त्यातल्या ३३ निवडून आल्या. म्हणजेच, उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी ४१ टक्के उमेदवार विजयी झाले, तर १९ टक्के मते मिळाली. भाजपच्या या वाढलेल्या जागा पुढच्या म्हणजे २००७ च्या निवडणुकीत पुन्हा आठने कमी होऊन त्या २५ पर्यंत घसरल्या. पुढे २०१२ मध्ये भाजपच्या जागा २६ झाल्या.
आणि या पार्श्वभूमीवर आली २०१७ ची मोदी लाटेची निवडणूक. महापालिकेच्या १९९२ पासूनच्या निवडणुकीपासून २००२ मधल्या ३३ जागांचा अपवाद वगळता साधारणतः वीस-पंचवीस जागांमध्येच खेळणारा भाजप या २०१७ मध्ये गरुडझेप घेतो आणि ९८ जागा पटकावतो, हे ऐतिहासिकच होते. त्यानंतर समाविष्ट ११ गावांच्या दोन जागांपैकीही १ जागा मिळाल्याने तो पक्ष ९९ पर्यंत गेला.
भाजपने प्रथमच पुणे महापालिकेतील सत्ता मिळवली, याचे विश्लेषण नंतर प्रदीर्घ काळ होत राहिले. महापालिकेची २०१२ मध्ये निवडणूक झाली आणि त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळविले. तीच लाट पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीतही कायमच राहिली. लोकसभा-विधानसभेतील काँग्रेसच्या हक्काच्या जागा जशा भाजपने हिसकावून घेतल्या, तशाच पुणे महापालिकेतीलही काँग्रेसचे हक्काचे भाग भाजपने हिसकाविले. अर्थात, मोदी लाटेला अनुकूल अशा काही स्थानिक बाबीही पुण्यात होत्या. पुण्यात पक्षसंघटनेचा विस्तार करण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आले. इतर पक्षांतून ऐनवेळी आयात केलेले मातब्बर उमेदवारही पक्षाला उपयोगी ठरले. पक्ष प्रचारासाठी तीन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री यांनी वेळ दिला. त्यामुळे भाजप हा पुणे महापालिकेत सर्वांत प्रबळ ठरला.
या २०१७ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ वर्षांनी पुन्हा निवडणूक होत आहे. पुलाखालून खूप पाणीही वाहून गेले आहे. नेमके काय होईल? ते कळण्यासाठी आपल्याला काही महिने थांबावे लागणार आहे.